मन:शांतीचं उत्तुंग शिखर

IMG-20240601-WA0009.jpg

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला अशा पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार पर्वत. दहा हजार पायऱ्या चढून तिथे जाणं हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी तिथे एकदा तरी जायलाच हवं असं हे स्थान आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ आणि त्यांचं बोलावणं यावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे अनेक वेळा ठरवून देखील गिरनारची यात्रा करण्याचा योग काही येत नव्हता. डिसेंबरमध्ये अचानक मैत्रिणीचा फोन आला आणि तिने अगदी सहज विचारलं, गिरनारला येणार का ? एका क्षणाचा ही विचार न करता हो म्हणून सांगितलं. दुर्ग मल्हार ट्रेक अँड टूर्स यांची सोबत आणि आपल्या माणसांची साथ यामुळे ही यात्रा आनंददायी झाली. चार पाच दिवसांच्या या प्रवासाने समाधान, आनंद आणि संयम दिला असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. या स्वप्नवत यात्रेची हकीगत अशी…..
४ फेब्रुवारीला ट्रेनचा प्रवास करून ५ फेब्रुवारीला सकाळी पावणे पाचच्या दरम्यान जुनागढला उतरलो. जुनागढ स्टेशनवरून जवळच असणाऱ्या भारती आश्रमात पुढचे तीन दिवस आम्ही राहणार होतो. आश्रमात पोचल्यावर आम्ही आवरून सोमनाथला जाण्यासाठी निघालो. गुजरातच्या सौराष्ट्रात वेरावळ जवळ सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ हे अग्रस्थानी आहे. अथांग अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं प्रशस्त सोमनाथचे मंदिर फारच आकर्षक दिसते. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही. सोमनाथ मंदिराच्या परिसरातील पर्यटन स्थळांपैकी एक असणारे हे भालकातीर्थ म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. त्यावेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या पायाला हरण समजून बाण मारला होता. त्याचे संदर्भ या ठिकाणी आढळून येतात. त्याच सोबत इथे जवळच त्रिवेणी घाट आहे, जिथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणचा इतिहास, वास्तुकला यांची माहिती घेऊन आम्ही परत जुनागढला जाण्यास निघालो. परत आश्रमात येऊन जेवण-आराम करून ६ फेब्रुवारीच्या रात्री १२ :३० च्या दरम्यान गिरनार चढण्यास सुरूवात केली. १९ जणांपैकी १० जणे गिरनार चढून गेले तर उरलेले ९ जणं सकाळी रोपवेने येणार होते. गिरनारच्या यात्रेमध्ये चार टप्पे महत्वाचे आहेत. साधारणपणे २८०० पायऱ्या झाल्या की ‘जैन मंदिर’ येते. अंदाजे ५००० पायऱ्यांवर दुसऱ्या टप्प्यात ‘अंबाजी मंदिर’ येते. अंबाजी हे देखील एक देवीचे शक्तीपीठ आहे. त्यानंतर तिसरा टप्पा ‘गोरक्षनाथ’ साधारण ७००० पायऱ्यांवर आहे. हा टप्पा सर्वात उंच टप्पा आहे. त्यानंतर, शेवटचा म्हणजेच चौथा टप्पा असलेले गुरुशिखर दिसू लागते. पौर्णिमा नसल्यामुळे गर्दी तशी फारच कमी होती. पण प्रत्येक जण बॅटरीच्या प्रकाशात आजूबाजूचं जंगल न्याहाळत, एकमेकांची सोबत करत आणि मनात दत्त महाराजांचं नाम असं करत पाचच्या दरम्यान गोरक्षनाथ मंदिराशी आलो. गुरुशिखरावरील दत्त मंदिर ६ :३० ला उघडत असल्याने आम्ही गोरक्षनाथाच्या इथेच एक तास थांबलो. आणि योगायोगाने गोरक्षनाथाची आरती देखील मिळाली. आपले चरण दर्शन मला सतत व्हावे “, ही गोरक्षनाथांनी केलेली प्रार्थना दत्त महाराजांनी मान्य केली. म्हणून हे स्थान उंच पर्वतावर आहे. आजही गुप्तरुपानी गोरक्षनाथांचा वावर आहे अशी भक्तांची धारणा आहे.
थोडे अंतर चालून गेल्यावर २ कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून २००-३०० पायऱ्या उतरून गेल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे १००० पायऱ्या चढल्यावर उभ्या सुळक्यासारखे असणारे श्री गुरुशिखर आहे. याच ठिकाणी गुरु दत्तात्रेयांनी १२००० वर्षे तपश्चर्या केली. गुरुशिखरावर आत प्रवेश केल्यावर पादुकांवर साक्षात निलमणीसारखी कांती असणार्‍या आणि चंपाकळीसारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते. त्याक्षणी वाटणारे भाव शब्दात व्यक्त करणं अवघडच…! दत्त पादुका दर्शन, धुक्याची पसरलेली चादर, डोंगराआडून वर येणारा सूर्य आणि त्याच्या असंख्य छटा हे विहंगम दृश्य डोळ्यात मावणं अशक्यच…! पण डोळ्याचे पारणे फेडणारे आहे असं नक्कीच म्हणता येईल. दर्शन घेऊन नंतर कमानीच्या उजव्या बाजूला खाली जाऊन प्रसाद घेतला. आमचा परतीचा प्रवास आणि रोपवेने वर येणाऱ्याचा प्रवास समांतर सुरू होता. रोपवे अंबाजी मंदिरापर्यंतच असल्याने पुढे एकत्र चालत किंवा डोलीच्या मदतीने गुरुशिखरपर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे काहींनी डोली तर काहींनी जिन्याने गुरुशिखर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आणि नंतर परतीच्या प्रवासाला लागले. पण हे क्षण फक्त अनुभवण्यासाठी असतात असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. ही गिरनारची यात्रा याची देही याची डोळा सुफळ संपूर्ण करता आली याचा आनंद आणि समाधान शब्दातीत आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.

|| श्री गुरुदेव दत्त ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these