दुर्ग मल्हार ट्रेक्स ऍन्ड टुर्स तर्फे अमरनाथ यात्रा करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्यासाठीची मेडिकल, रजिस्ट्रेशन, तिकीट रिझर्व्हेशन इ. गोष्टी पार पाडत जाण्याचा दिवस अखेर जवळ आला.
दिनांक ८.७.२०२४ रोजी सकाळी सर्व एअर पोर्टवर भेटलो. त्यादिवशी मुंबईत पावसाने रौद्र रूप धारण केले होते. सर्व एअरपोर्टवर पोहोचले ही स्वामीकृपाच. तिथे किरणने थेपले व पुरणपोळीचे पॅकेट दिले. दुर्ग मल्हारतर्फे सुंदर सॅक, एक हँगिंग बॅग, टोपी आणि आठ दिवसांचा सुका खाऊ आधीच देण्यात आला. आठ तारखेला विवेकदादाचा वाढदिवस असल्याने आश्चर्याचा सुखद धक्का देत डॉ. माधवीताईंनी म्हणजेच संजय लोकरे यांच्या मिसेसने खजुराचा केक करून पाठविला होता तो विवेकदादाला कापायला लावला. दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. एअर इंडियाचे AI 592 हे विमान १०.१५ ऐवजी तासभर उशिराने म्हणजे सकाळी ११.३७ ला सुटले. विमानात आमच्या सर्वात शेवटच्या म्हणजे ३१ A ते ३२ F अशा सीटस् होत्या परंतु कनेक्टींग फ्लाईट आले नसल्याने विमान भरपूर रिकामे होते. एअर हॉस्टेसने आम्हाला पुढच्या विंडो सीटवर जाऊन बसायला परवानगी दिली मग आम्ही भराभर विंडो पटकावल्या. उशीर झाल्याने कॉम्प्लिमेंटरी म्हणून एक आणि नेहमीचा एक असे दोन बॉक्स नास्ता दिला. त्यात ब्रेडचे कॉर्न सँडविच, व्हेज, नॉन व्हेज ब्रेड रोल, दही, केक असा स्वादिष्ट नास्ता आणि चहा-कॉफी देण्यात आली. आज आमची चांगलीच चंगळ झाली. विमानाने दुपारी १२.४२ वाजता जम्मू विमानतळ गाठले. तेथून सेव्हन सीटर गाड्यांनी कटराला अनुराग हॉटेलवर गेलो. रूमवर जाऊन थोडा वेळ आराम करून संध्याकाळी चहा कॉफी घेतली. हॉटेलच्या मालकाने जो विवेकदादा मित्र आहे त्याने सुद्धा सुंदर केकची व्यवस्था केली होती. परत एकदा विवेकदादाचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले. तो तर अगदी भारावूनच गेला होता. त्यानंतर बाजूलाच असलेल्या बिल्डिंगमध्ये वैष्णोदेवीसाठीच्या एंट्रीचे रजिस्ट्रेशन करायला गेलो. सर्वांना आधारकार्ड पाहून वैष्णोदेवीसाठी एंट्रीकार्डस् देण्यात आली. साडेआठ वाजता जेवण करून साधारणपणे एक तास आराम करून आंघोळी करून दर्शनाला जाण्यासाठी सगळे तयार झालो. प्रति रिक्षा 200 रुपये देऊन गेटवर पोहोचलो. आता पावसाने आगमन केल्याने पोंचो, रेनकोट घातले. आम्ही सात जणांनी घोडे करून (प्रति घोडा सहा हजार) तर सहा जणांनी चालत जायचे ठरवले. यात्रा सुरू करायला रात्रीचे बारा वाजले. पावसाने हळूहळू रौद्र रूप घेतले. वरच्या शेडवर त्याचा तडतडाट सुरू होता. घोडे पावसाच्या आवाजाने थोडे बुजत होते पण आमचे घोडेवाले खूप चांगले होते. फार जपून त्यानी आम्हाला नेले. लॉकरमध्ये सामान ठेवण्यात वेळ खर्च होऊ नये म्हणून त्यांच्या ओळखीच्या प्रसादाच्या दुकानात शूज, बॅगा ठेवल्या. प्रसादाच्या कापडी पिशव्यात सुका मेवा व काजूकत्री मोकळी ठेवून दर्शनाला गेलो. ब्राम्ह मुहूर्तावर पहाटे पावणेचार वाजता मुख्य स्थानाचे तसेच नवीन बांधण्यात आलेल्या सुंदर गुंफेतून जाऊन महाकाली, महालक्ष्मी व महा सरस्वती यांचे डोळेभरून दर्शन घेतले. पुजारी स्वतः अगत्याने सर्वांना दर्शनाला बोलावून देवींची नांवे सांगून माहिती देत होते हे फारच छान वाटले. आम्ही नेलेल्या प्रसादाचा भोग चढवून थोडा काढून ठेवून उरलेला परत दिला. मुंबईतील तुफान पावसातून तसेच इथेही जोरदार पाऊस असून सुध्दा निर्विघ्नपणे वैष्णोदेवी मातेने इतके अप्रतिम दर्शन दिले हे पाहून मी तर भारावूनच गेले होते. तिच्याकडे काही मागण्याचे विसरूनच गेले. माते नमो नमः अशीच कृपादृष्टी सर्वांवर राहूदे. त्यानंतर भैरवनाथाचे दर्शन घेतले. पहाटेची वेळ होती. भैरवनाथ मंदिराबाहेर पूर्व दिशेला गुलाबी लालिमा चढू लागला होता. पहाटे रोषणाईने झळकणारे मातेचे मंदिर आणि आताचा पहाटेचा अप्रतिम नजारा माझ्याजवळ मोबाईल नसल्याने मला टिपता आला नाही पण त्याची उणीव संजय दादांनी भरून काढली. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. उतरण असल्याने घोड्यावर हादरे बसू लागले. प्रवास लवकर संपू दे असे वाटू लागले. सकाळी आठ वाजता आम्ही खाली पोहोचलो. प्रति रिक्षा ३०० रुपये देऊन अनुराग हॉटेलवर गेलो. तिथे विवेकदादाने आधी फोन करून नास्ता सांगून ठेवला होता. पोहे, दही पराठा व ब्रेड बटर तयार होते. ते खाऊन चहा कॉफी घेऊन सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. जाग आल्यानंतर उठून आंघोळ, जप पोथी वाचन केले. त्यानंतर परत डोळा लागला आणि साडेसात वाजता उमाने येऊन उठवले. जेवण सव्वा आठला चालू झाले. जेवून विवेकदादांनी दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सांगितला. थोडीशी शतपावली घालून सर्वांनी बॅगा भरून ठेवल्या कारण सकाळी साडेआठला चेक आउट करायचे होते. परत एकदा झोपेच्या अधीन झालो.
दिनांक १०.७.२०२४ रोजी
सकाळी साडे सात वाजता नास्ता करून, साडेआठ वाजता कटरावरून
श्रीनगरला जाण्यासाठी प्रयाण केले. तावी नदीच्या बाजूने हिरवेगार डोंगर, सुंदर दऱ्या, हिरवीगार भात शेती आणि त्यातील टुमदार सुबक घरे, सफरचंदाच्या बागा पाहून मन प्रसन्न झाले. जाता जाता दुपारी भग्नावस्थेतील आपले हिंदू मार्तंड सूर्यमंदिर पाहिले. आपल्या देवीदेवतांची केलेली प्रतारणा पाहून मन विषण्ण झाले. मंदिराच्या परिसरात रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे गुलाब पाहिले. सर्वांनी भरपूर फोटोग्राफी केली. त्यानंतर रस्त्यात केशर, सुका मेवा आणि छोट्या लाकडी बॅटची खरेदी केली. पाचच्या आत श्रीनगरला रजिस्ट्रेशन व RFID एंट्री कार्ड्स घेण्यासाठी पोहोचायचे होते. आम्ही श्रीनगरला अमरनाथसाठी एंट्री कार्डस् घेतली आणि पाच मिनिटांत रजिस्ट्रेशन बंद झाले. संजयदादा आणि मिलन ताईंना दुसऱ्या दिवशी बोलावले. मग आम्ही श्रीनगरला हॉटेल व्हॅली व्ह्यू मध्ये चेक इन केले. दुसऱ्या दिवशी सोनमर्गला जायचे होते त्यासाठी दोन दिवसाच्या कपड्यांचे वेगळे पॅकिंग करून ठेवले. बाकीचे समान याच हॉटेल मध्ये स्टोअर रूममध्ये ठेवून दिले कारण परत इथे दोन दिवसांचा मुक्काम होता. रात्री लवकर झोपलो.
दिनांक ११.७.२०२४ रोजी
सकाळी साडे सात वाजता नास्ता करून, साडेआठ वाजता श्रीनगरवरून
सोनमर्गकडे प्रयाण केले. रस्त्यांत खिरभवानी देवीचे सुंदर असे मंदिर पाहिले. जी काश्मिर विध्वंस मधून वाचलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर आहे. सभोवताली अष्टकोनी चर असून त्यातले नितळ पाणी ज्यावेळी देशावर संकट येणार असेल तेव्हा आपला रंग बदलते असे समजले. अतिशय रम्य असा परिसर होता. तिथे प्रसाद म्हणून खीर मिळाली. नंतर रस्त्यांत एका धाब्यात जेवून साधारण तीन साडेतीन वाजता सोनमर्गला हॉटेल *माऊंटन व्ह्यू * वर पोहोचलो. संपूर्ण डोंगरावर सुरुची हिरवीगार आणि उंच उंच झाडे खूप शोभायमान दिसत होती. सभोवताली दिसणारा हा नजरा पहातच रहावा असा होता. तो बघूनच खूप आनंद झाला. आता इथे थंडी जाणवू लागली होती. आजची उत्सुकता काही वेगळीच होती. अमरनाथ दर्शन कसे होईल याची ओढ लागली होती. साडेचार वाजता घोडे ठरविण्यासाठी माणसे आली. विवेक दादांचे त्याआधी हेलिकॉप्टरसाठी सुध्दा प्रयत्न करून झाले. रुपये चार हजार आठशेमध्ये घोडे ठरले. त्यांनी बारा तारखेला पहाटे तीन वाजता गेटवर बोलावले. बॅच बनविण्यासाठी सर्वांच्या एंट्री कार्डस् वरचे नंबर घेऊन ते निघून गेले. मग आम्ही शॉपिंगला निघालो. मी आणि बर्वे काकांनी दुसऱ्या दिवसासाठी जॅकेट्स घेतली. शॉपिंग करून आठ वाजता सर्व हॉटेलवर परतलो. जेवण करून रूममध्ये गेलो. कोणालाही झोप आली नाही. आंघोळी करून थर्मल, जॅकेट्स, टोप्या, हुडी, हँड ग्लोज, मोजे अशा संपूर्ण तयारीनिशी पावणेदोन वाजता सज्ज झालो. कोई मिल गया मधल्या जादूसारखे सर्व मजेशीर दिसत होते. विवेकदादाला बालताल वरून निरोप आल्यानंतर तीन वाजता अमरनाथ यात्रेसाठी निघालो. बालतालला पोहोचायला साधारणपणे अर्धा पाऊण तास लागला. रस्ता खडकाळ असल्याने गाडी हळू जात होती. पावणेचार वाजता बालतालला पार्किंगमध्ये पोहोचल्यावर यात्रा अजून सुरू झाली नसल्याने थांबावे लागेल असे कळले. थंडीसाठी जय्यत तयारी केली असून सुध्दा थंडीचा कडाका प्रचंड जाणवत होता. तासाभराने यात्रा सुरू होत असल्याचा निरोप आला आणि अंगात वारे संचारल्यासारखे सर्व जण निघाले. सिक्युरिटी चेकिंग पार करून रांगेत गेलो. त्यातच पावसाने हजेरी लावली. तिथे विकणाऱ्या विक्रेत्यांकडून पोंचो, हातमोजे खरेदी करून अंगावर चढवून रांगेत पुढे सरकत यात्रा गेटवर पोहोचलो. गर्दी टाळण्यासाठी आम्हाला थांबविण्यात आले. साडेपाच वाजता यात्रा सुरू झाली. अंतर्मनात विविध संमिश्र भावनांची सरमिसळ सुरू होती, भावनांचे कल्लोळ उठत होते. त्यात इथपर्यंत येऊन पोहोचल्याचा आनंद, दर्शनाची लागलेली प्रचंड आस, पुढील प्रवासाची उत्सुकता, थोडीशी धाकधुक परंतु स्वामींवरील अतूट श्रध्दा या साऱ्याचा समावेश होता. मिलेटरीवाले गेटवर पहारा देत उभे होते. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटला. त्यांना जयहिंद म्हणत तर हर हर महादेवाचे नारे लगावत आमच्या यात्रेला अखेर सुरुवात झाली आणि अंगावर आनंदाने रोमांच उठले. हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत साधारण एक किलोमीटर चालल्यावर घोड्यांचा तळ आला तिथे आमचे सोळा घोडेवाले सज्ज होते. फक्त प्रवासाला सुरुवात करताना पाच लेडीज पुढे गेल्या आणि आम्ही बाकीचे पाठी राहिलो. घोड्यांवरून थोडे पुढे गेल्यावर खाली उतरावे लागले. परत सिक्युरिटी चेकिंग झाले आणि अखेर नियमित यात्रा सुरू झाली. वैष्णोदेवीपेक्षा हे घोडे छोटे म्हणजे खच्चर असल्याने बसायला आरामदायक वाटले. गंमतीची आणि काळजीची गोष्ट म्हणजे मला घोड्यावर बसल्यानंतर लागलेल्या थंडगार वाऱ्यामुळे सारखी झोप येऊन झोक जात होता. नऊच्या दरम्यान घोडेवाले चहापाण्यासाठी थांबले. आम्ही सुद्धा चहा घेतला, सकाळी विवेकदादांनी हॉटेलमधून बनवून घेतलेला नास्ता ज्यात सँडविच व केळी होती ती सर्वांनी खाल्ली. आता कडक ऊन लागू लागले. सलग तीन डोंगरावर चढून परत उतरून प्रवास सुरु होता. ऊंच ऊंच शिखरे, शिखरांवर दिसणारा पांढरा शुभ्र बर्फ, दऱ्यांमधून खळखळ आवाज करत वाहणारी सिंधू नदी हा आजूबाजूला दिसणारा विहंगम नजारा पहाता पहाता देहभान विसरायला होत होते. आपण कैलासावर महादेवाच्या दर्शनासाठी जात आहोत, अशक्य ते शक्य स्वामींनी करून दाखवले होते याचा आनंद गगनात मावत नव्हता आणि हो कैलास तर काही हातच दूर असल्याचा भास होत होता. सारेच अप्रतिम, अलौकीक, अद्वितीय होते. अंगावर रोमांच उठत होते. डोंगर उतरून खाली गेल्यावर जेव्हा स्वच्छ, सुंदर, नितळ अशा निळाशार पाण्याची नदी आणि तिच्या सभोवताली पसरलेले पांढरे शुभ्र गोटे जवळून दिसले तेव्हा क्षणभर तिच्या पाण्यांत पाय घालावेसे वाटले. डोंगराच्या घळीतून सतत हेलिकॉप्टरची ये जा सुरू होती. वळणावळणाच्या रस्त्यांवरून एका रांगेत चालणारे घोडे, त्यावरील आमचे दुर्गमल्हार ग्रुपचे सोबती, त्यांच्या पाठीवर असणाऱ्या लाल काळ्या रंगाच्या सॅक, डोक्यावरील लाल काळ्या टोप्या खूप छान दिसत होत्या. फक्त फोटोग्राफी करता येत नव्हती कारण सॅक पाठीवर असून त्यातून मोबाईल काढता येत नव्हते. पुरुष वर्गाला ते शक्य झाले कारण त्यांच्या पोटाला बांधलेल्या ऍडीशनल छोट्या सॅक बॅगमध्ये त्यांचे मोबाईल होते. नजरेत कैद झालेला तो नजरा डोळ्यासमोरून अजूनही हलत नाही. मजल दरमजल करत अमरनाथच्या घोड्यांच्या तळापर्यंत पोहोचलो. समोर बर्फानी बाबांची गुंफा दिसत होती. आपण स्वर्गाजवळ पोहोचलो याचा खूप आनंद झाला. तिथून डोली करून गुंफेत गेलो. तिथे पोहोचताना चिन्मय नि संजयदादा यांच्या तब्येती बिघडल्या. चिन्मयचे बीपी हाय झाले तर संजयदादांना श्वासाचा त्रास झाला. महिला वर्गाला गरगरत होते. आमच्या डोलीवाल्यांनी चेकिंग पॉईंटवर उतरवले तर काहींनी पूर्ण देवळापर्यंत नेले. आता त्या पवित्र स्थानात आणि आमच्यात फक्त तीनशे पायऱ्यांचे अंतर राहिले होते. चिन्मयची तब्येत बिघडल्याने थोडे दडपण आले होते. त्याला डोलीवाल्यांनी हाताला धरले तर मला विवेकदादानी पकडले. मंदिरात चढतांना पूजा गंद्रेची पर्स पडल्याचे कळले. सर्वांना ती पायाखाली शोधायला सांगितली. आता देवळांत पोहोचलो. साडे अकरा वाजता डोळेभरून दर्शन झाले. शिवलिंग जवळजवळ वितळले होते. माता पार्वती व गणपती बाप्पांचे बऱ्यापैकी दिसत होते. मंदिरात वरती पांढरी कबुतरे फिरत होती. जी शिवपार्वतीच्या रुपात आजही आहेत अशी आख्यायिका आहे. हे सर्व शब्दातीत होते. त्यावेळच्या भावना एवढयाच होत्या की मी स्वप्नात तर नाही ना. माझी इच्छा त्या महादेवाने, स्वामींनी पूर्ण केली होती. गेल्या वर्षी सलग एकविसावी गिरनार पौर्णिमा असल्याने हुकलेली संधी स्वामी कृपेने आज परत मिळाली आणि दर्शनाच्या आसेने जिवाची होणारी तगमग थांबली याचा कोण आनंद होत होता. माझे मनोरथ त्यांनी पूर्ण केले होते ते सुद्धा विनासायास. जन्मोजन्मीचे पुण्य असावे म्हणूनच हे केवळ शक्य झाले. फक्त पूर्ण शिवलिंग दिसले असते तर अजून आनंदात भर पडली असती पण ईश्वरी इच्छेपुढे कोणाचेच काही चालत नाही. डोलीवाल्यांनी परत आणून घोड्यांच्या तळाजवळ सोडले. इथे एकमेकांची वाट पाहण्यात अडीच तास वाया गेले. लंगरमध्ये थोडा प्रसाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चहासाठी एक ब्रेक घेऊन परतीचा चार तासांचा (कारण उतरतांना वेळ कमी लागतो म्हणून) प्रवास पार पाडून साडे सहा वाजता खाली आलो. चालवत नव्हते तरी कसेबसे चालत पार्किंगमध्ये गाडीत जाऊन बसलो. उशीर झाला तर टेंटमध्ये मुक्काम करावा लागणार होता पण संजयदादा झोपूनच असल्याने त्याचे कारण सांगत विवेकदादाने गाडी मेन गेटच्या बाहेर काढली. थोडया वेळात परत गाडी अडवली पण स्वामीकृपेने सुखरूप बाहेर निघालो. बालतालवरून सोनमर्गला हॉटेलवर पोहोचलो. जेवणाला थोडावेळ असल्याने रूमवर जाऊन पडलो. अंगात ताकत नसताना सुद्धा जेवायला जावे लागले कारण दिवसभर मी चक्क उपवास केला फक्त प्रसाद म्हणून लंगरमध्ये दोन घास खाल्ले होते. आज खूप मोकळे मोकळे वाटत होते. पटकन जेवून झोपी गेलो. दमल्याने आणि मनोरथ पूर्ण झाल्याने झोप लगेच लागली.
दिनांक १३.७.२०२४ रोजी साडे आठ नास्ता करून, साडे नऊ वाजता बॅगांसहीत सोनमर्गवरून श्रीनगरकडे प्रयाण केले. रस्त्यात सिंध नदीच्या सेल्फी व्ह्यू पॉइंटवर मस्त फोटो काढले. श्रीनगर येथे हॉटेल व्हॅली व्ह्यू मध्ये आगमन झाले. चेक इन करून तासाभराच्या विश्रांतीनंतर लाल चौकमध्ये सर्वांनी मनसोक्त खरेदी केली. विवेकदादानी त्याच्या वाढदिवसाचे आईस्क्रीम सर्वांना पोटभर खायला घातले फक्त मी आणि संजय दादांनी घसा खराब असल्याने कोल्ड कॉफी घेतली. हॉटेलवर परत येऊन जेवण केले. जेवणानंतर थोडे पॅकिंग करून झोपी गेलो.
दिनांक १४.७.२०२४ रोजी
सकाळी सहा वाजता उमा आणि क्षिप्रा या दोघी मुंबईला जाण्यासाठी निघाल्या परंतु लाईट गेल्यामुळे त्या थोडा वेळ लिफ़्टमध्ये अडकल्या पण लाईट येताच त्या विमानतळाकडे रवाना झाल्या. उमाचे एअर इंडियाचे विमान एक तास तर क्षिप्राचे चार तास लेट झाले. नास्ता केल्यानंतर आम्ही श्रीनगरचे साईट सीन बघायला निघालो. प्रथम शंकराचार्य मंदिर पहाण्यासाठी गेलो. तेथे मिलेटरी चेकिंग नंतर बसमधून उतरून पुढे रिक्षांनी दोन किलोमीटर गेलो. रिक्षावाल्याने अर्धवट उतरवले. मंदिर जवळ येताच परत चेकिंग झाले व त्यानंतर अडीचशे तीनशे पायऱ्या चढून अतिप्राचीन असलेले सुंदर असे शंकराचार्य मंदिर पाहिले. याठिकाणी आद्य गुरु शंकराचार्य यांची समाधी आहे. उंचावरून अतिशय नयनरम्य असा खालचा नजारा दिसत होता. मंदिरातून खाली उतरल्यावर प्रसाद म्हणून चहा आणि काहींनी लंगरमध्ये जेवणाचा प्रसाद घेतला. परत रिक्षाने / चालत जाऊन बसमध्ये बसलो. पुढचे ठिकाण तीन गार्डन होती. तिथे त्यांच्याच बसने जावे लागले. परिमहल गार्डन, चष्मे शाही गार्डन, बोटॅनिकल गार्डन पाहून जेवून घेतले. त्यानंतर सर्व मुघल गार्डन पाहायला गेले. माझी तब्येत जरा नरम झाल्याने व प्रचंड झोप येत असल्याने मी बसमध्ये जाऊन झोपले. अडीच तासांनी मुगल गार्डन आणि खरेदी करून सगळे परतले. मग आम्ही दाल लेकमध्ये बोटींगसाठी गेलो. दाल लेक मध्ये *G-20 मीटिंग जेथे झाली ते पंचतारांकित हॉटेल संतूर, कबुतर खाना, हरिसिंग महाराजांनी तयार केलेले जे आयलंड होते त्यावरील महाराजा पॅलेस, मिशन कश्मीर पिक्चरचे शूटिंग झालेला पॉईंट, जब जब फुल खिले या शम्मी कपूरच्या पिक्चरचे जिथे शूटिंग झाले तो शिकारा, बोट निर्मिती कार्यशाळा, हरिपर्वत किल्ला, चार चिनार, गव्हर्नमेंट मालाची दुकाने ज्यात काश्मीरी साडया, ड्रेस मटेरियल, विविध कलाकुसरीच्या लाकडी वस्तू इ. सामान असलेला आणि डोळे दिपवणारा मिनाबाजार, फ्लोटिंग शॉपिंग सेंटर, भाजीबाजार, जवळजवळ दीड हजार लोकांची जुनी पाण्यातील काश्मीरी वस्ती, सुकून हा सगळ्यात महागडा शिकारा, सर्वात पहिला आणि जुना शिकारा, कमळांची शेती, हैदर पिक्चरचे शूटिंग झालेला मुघल ब्रिज अशी विविध ठिकाणे पहिली. गव्हर्नमेंट शॉपमध्ये जाऊन साड्या पहिल्या. भरपूर नयनसुख घेऊन तासाभराने परत आलो. हॉटेलवर येऊन जेवून आपापल्या रुममध्ये विसावलो.
दिनांक १५.७.२०२४ रोजी दुपारी SG 8386 या ४.०५ च्या स्पाईस जेटच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण करायचे होते परंतु विमान चार तास लेट झाल्याचा मेसेज आला. तरी पण श्रीनगरहून दुपारी बारा वाजता चेकाऊंट केले कारण मोहरमचा जुलूस निघणार होता. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले असते व विमानतळावर पोहोचायला उशीर झाला असता. प्रथम पुजाचे आधारकार्ड बनवून घेतले. आता श्री नगर एअरपोर्टवर जाण्यासाठी प्रस्थान केले. जाताना रस्त्यात हॉटेल हेरिटेज लक्झरी मध्ये थोडे जेवण केले आणि एअरपोर्टवर जाऊन थांबलो. स्पाईस जेटच्या काऊंटरवर विवेकदादाने बोर्डिंग, सिक्युरिटी चेक इन कधी करणार याबद्दल चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते. शेवटी विवेकदादाने रुद्रावतार धारण केल्यावर एकदाचे आत घेतले. विमान सारखे लेट असल्याचे दाखवत होते. यावरून विमानतळावर प्रचंड गदारोळ माजला होता. अमरनाथ यात्रेकरूंना प्रचंड त्रास झाला. सकाळी सात पासूनची विमाने लेट केली होती. प्रचंड गर्दीमुळे विमानतळावरचे पाणी संपले होते, महागडे खाणे आणि चहा, कॉफी घेण्याची सर्वांचीच ताकद नव्हती. यामुळे अमरनाथ यात्रींचे प्रचंड हाल झाले. अखेर पाच तासांनी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी विमान लागले. लोकांशी इतके वाईट वागल्याची त्यांना आजिबात लाज वाटत नव्हती. कॉम्पेंसेशन म्हणून चहा, कॉफी किंवा नास्ता देणे आमच्या हातात नाही,आम्ही काहीच करू शकत नाही असे त्यांचे उर्मट उत्तर होते. येताना एअर इंडियाने एक तास विमान लेट झाले म्हणून नास्ता दिला होता आणि स्पाईस जेट कंपनी, किती फरक होता त्यांच्यात. परत या एअर लाईनने प्रवास करायचा नाही असे सर्वांनी मनाशी पक्के ठरवले. रात्री ९.५२ ला विमानाने उड्डाण केले आणि छत्रपती शिवाजी टर्मिनलला रात्री १२.२९ वाजता उतरले. बॅगा ताब्यात घेऊन जड अंत:करणाने मंडळी आपापल्या घरी गेली. या टुर्सचे प्रमुख श्री. विवेक पाटील आणि त्यांचे असिस्टंट श्री. किरण जाधव यांनी सर्वांना अतिशय उत्तमरीतीने हाताळले. अचूक नियोजन करून उत्कृष्टपणे काळजी घेतली. स्थळदर्शनाची सुंदररित्या माहिती पुरविली. त्याने केलेल्या सुंदर नियोजनामुळे सहलीची गोडी वाढली आणि ती जराही त्रासदायक किंवा कष्टदायक न होता अविस्मरणीय अशी झाली. सर्वत्र थ्री स्टार हॉटेल देऊन आमच्या पोटाची सुध्दा विशेष काळजी घेतली. या सहलीत देवाचे सुद्धा जेवढे नाव घेतले नाही तेवढया विवेकदादा आणि विशेषतः किरणला हाका मारल्या. मदतीस सदा तत्पर असणाऱ्या या दोघांनाही परमेश्वर अधिकाधिक शक्ती देवो. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना लाखमोलाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुर्गमल्हारचे नाव देशोदेशांत गाजो, ही सदिच्छा. या यात्रेचे अतिशय सुंदर फोटो, व्हिडिओ काढल्याबद्दल संजय दादांचे खूप खूप आभार. चिन्मयने विवेकदादाच्या मदतीने ही आमची यात्रा घडवून आणली त्याबद्दल त्याचे पण खूप खूप आभार. तसेच ही यात्रा यशस्वी करणाऱ्या आमच्या सर्व यात्रेकरूंचे सुध्दा खूप खूप आभार. लवकरच दुर्ग मल्हारच्या पुढील सहलीत भेटुया. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ
जय बाबा गिरनारी
सीमा विकास चौबळ / २३.७.२०२४.