सज्जनगड
सह्याद्री गिरीचा प्रभाग विलसे मंदार शृंगापरि | नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी | साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी | येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी |
– कवी अनंत फंदी
सातार्यापासून अर्धा पाऊणतासाच्या अंतरावर उरमोडी / उर्वशी नदीच्या खोर्यात सज्जनगड उभा आहे. परळी गावाजवळ वसलेला म्हणून परळीचा किल्ला अशा नावाने ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला. नंतर तो आदिलशहाच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेऊन डागडुजी करुन समर्थांना कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी दिला. त्याचे नामकरण झाले ‘ ‘
‘सज्जनगड ‘
दुपारी दोन अडीज वाजता आम्ही गड चढायला सुरवात केली.शंभर पायर्या चढायच्या होत्या. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नव्हते, बारीक पाऊस सुरु होता.
जय जय रघुवीर समर्थ च्या नामघोषात पायर्या चढायला सुरवात झाली.
पायर्यांच्या डाव्या उजव्या बाजूला थोड्या थोड्या अंतरावर अकरा मारूती स्थापन केलेले आहेत.
विशेष गर्दी नव्हती.
अर्ध्या तासात आरामात वरती पोचलो.
गडावर रामाचे देऊळ आहे. देवळाच्या खाली समर्थाचे समाधी मंदिर आहे.
समर्थांचे शेजघर, पेठेतला मारुती, समर्थ शिष्या अक्काबाई आणि वेणाबाई वृदांवन ,समर्थ मठ, अंगाईदेवी, धाब्याचा मारुती, गोशाळा, धर्मशाळा अशा वास्तू आहेत.क्रम चुकलेला असू शकतो. 😄
राम पंचायतनाचे दर्शन घेतले. या मुर्तींची पण एक गोष्ट आहे. या मूर्ती एका अंध कारागिराने बनवलेल्या आहेत. ती गोष्ट अशी,
तमिळनाडूमध्ये अरणी गावात मुर्तीकाम करणारे अनेक कारागीर रहात असत. या मुर्तीकारांध्ये सर्वात उत्कृष्ट असा एक
एक वृद्ध कारागीर तिथे होता परंतु मूर्ती करताना उडणारे धातूचे कण डोळ्यामध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टी अधू झालेली होती. त्याला अजिबात दिसत नव्हते. त्यामुळे त्याने मूर्तिकला थांबविली होती.
समर्थांना खूप वाईट वाटले आणि त्या वृद्ध कारागिराने आयुष्यभर केलेल्या परमेश्वराच्या सेवेचे फळ म्हणून की काय साक्षात समर्थ त्यांच्या दारात जाऊन हजर राहिले. समर्थ त्या कारागिराला म्हणाले की मला माझ्या नित्य पूजेसाठी रामाचे पंचायतन बनवून हवे आहे आणि ते तुमच्या हातूनच बनविले पाहिजे असा माझा अट्टाहास आहे. वृद्ध कारागीर रडू लागला . त्याने समर्थांना सांगितले की हे साधू मला आता दृष्टी उरलेली नाही त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही. यावर समर्थांनी त्या कारागिराला जे उत्तर दिले ते अक्षरशः हृदयात कोरून ठेवण्या सारखे आहे.
समर्थ त्याला म्हणाले , “अरे बाबा माझ्या प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची अजिबात आवश्यकता नाही. तो आत्माराम तर तुझ्या माझ्या अंतरंगात वास करतो आहे .त्याचे दर्शन आपल्याला आपल्या अंत:चक्षूंनी सुद्धा होऊ शकते.
आणि बहुतेक रामरायाची अशी इच्छा दिसते की तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे त्यामुळे तुच त्या मूर्ती घडविणार आहेस. ” असे म्हणत समर्थांनी त्या कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले त्याच्यासमोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला ! पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतरण प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत सुंदर मनोहरी अशा मूर्ती मध्ये झाले ! साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्या कारागिराला दर्शन दिले ! तो अक्षरशः कृतकृत्य झाला !
समर्थांच्या भेटीने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने विना विलंब अत्यंत सुंदर अशा प्रभू रामचंद्र ,श्री सीतामाई ,श्री लक्ष्मण आणि समोर उभा ठाकलेला दासमारुती, अशा अप्रतिम मूर्ती हातोहात घडविल्या. त्या मूर्ती पाहून समर्थ अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या कारागिराला विचारले की तुला काय हवे ते माग, त्यावर आरणीकर त्यांना म्हणाला समर्थ आपले दर्शन जाहले ,साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले !या डोळ्यांनी आता अन्य काही पहायची इच्छा उरलेलीच नाही. त्यामुळे माझी दृष्टी पूर्ववत आंधळी करून टाकावी इतकीच आपल्याला प्रार्थना आहे ,म्हणजे सतत त्या आत्मारामाच्या चिंतनात उरलेला काळ व्यतीत करता येईल ! समर्थांनी त्याची दृष्टी काही घालविली नाही परंतु सतत त्या आत्मारामाचे दर्शन घडेल अशी आत्म दृष्टी त्याला देऊ केली. अनुग्रह देऊ केला. आणि भरभरून आशीर्वाद दिले.
समर्थ गडावरती आले . त्या मूर्ती आज आपण ज्याला समर्थांचे शेजघर म्हणतो त्याचे घरामध्ये १४ दिवस त्यांनी पुजल्या . आजही त्या खोलीमध्ये राम मूर्तींचा ओटा म्हणून चंदनाची अत्यंत सुबक कलाकुसर असलेला एक लाकडी ओटा ठेवलेला आहे पहा, त्यावर त्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. पंधराव्या दिवशी समर्थ आपल्या आसनावरून खाली जमिनीवरती येऊन बसले, पद्मासन लावले ,दृष्टी नासाग्र स्थिर झाली ,डोळे मिटले .त्रिवार रामरायाचा जयजयकार केला आणि त्यांच्या देहातून प्राणज्योती चा मोठा लोळा बाहेर पडून तो थेट त्या रामाच्या मूर्तींमध्ये प्रवेश करता झाला हे सर्व उपस्थित शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तो दिवस होता माघ वद्य नवमी चा. ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळताच ते जातीने सज्जनगडा वरती उपस्थित झाले आणि मठाच्या शेजारी जो मोठा खड्डा होता तिथेच समर्थांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. दुसर्या दिवशी त्या चितेच्या स्थानी एक स्वयंभू समाधी प्रकट झाली. त्याच समाधी वरती पावणे दोन महिन्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत सुबक असे समाधी मंदिर बांधले व समाधीच्या बरोबर वरच्या बाजूला प्रभुरामचंद्रांचा ह्याच मूर्तींची स्थापना करण्यात आली. स्वतः समर्थांचे प्राण या मूर्तीमध्ये प्रविष्ट झालेले असल्यामुळे त्या मूर्तींची वेगळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. असे कदाचित भारतातील हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच ह्या मूर्ती वर्षातून पाच वेळा जागेवरून हलविल्या जातात व बाहेर अंगणामध्ये आणून स्वच्छ धुतल्या जातात जी सेवा कोणालाही मिळू शकते. या विधीला उद्वार्चन असे म्हणतात. आपण ह्या मूर्तीचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला असे लक्षात येईल की आरणीकराने रामरायाला डोळे तेवढे काढलेले नाहीत. एका अंध कारागिराने केलेल्या मूर्तीची ओळख म्हणून आजही ती कायम राहिलेली आहे !
रामाचे आणि समर्थांच्या समाधी ए दर्शन घेऊन झाल्यावर शेजघरात गेलो. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. तिथेच आम्हाला द्रोणभरुन गव्हाची खीर प्रसाद म्हणून मिळाली. प्रसाद खाऊन.झाल्यावर धाब्याच्या मारुतीला गेलो. मनोहारी
म्हणता येईल असे वातावरण होते.
वरुन उरमोडी नदीचे धरण दिसत होते. हिरव्या रंगाच्या असंख्य छटांमध्ये हिरवळ दिसत होती. आणि वारा इतका सुटलेला होता की छत्रीचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी छत्री बंद करुन तसेच भिजत फिरलो.
खूप मजा आली गडावर. अडीच तीन तास वर जसे गेले कळलंच नाही. येताना अंगाखांद्यावर देवीच्या देवळात जाऊन खाली उतरायला सुरवात केली.
विचार होता की एक मारुती आजच बघायचा पण ते होणे नव्हते. कारण कराडच्या रस्त्यावर केमिकल सांडले आणि बरीच वाहने घसरली ज्यात एक मोठी बस, कंटेनर पण होता. त्यामुळे एक तास आम्ही रस्त्यावर ठप्प! म्हणून मग मारूतीला जायचं कॅन्सल करुन कराडला मुक्काम केला.
तीन दिवस कसे गेले समजलेच नाही.
एक लिहायचं राहून गेलं. नरसोबाच्या वाडीला गेलात तर सोमण भोजनालयात जेवायला विसरू नका. अप्रतिम स्वयंपाक असतो. एक दीड तास वेटिंग असते.पण थांबल्याचं सार्थक होतं.
हा खरंतर पहिला दिवस होता पण तो शेवटी लिहितेय. 😄