रायरेश्वर किल्ला

IMG_20241103_135759.jpg

मागच्या आठवड्यात, अचानक एका वेगळ्याच ठिकाणी जायचा योग आला. रायरेश्वर किल्ला. आपल्या सगळ्यांचे आराध्या दैवत – छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. त्याच शिवरायांनी आपल्या जिगरी दोस्तांना – मावळ्यांना सोबत घेऊन, जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते पवित्र ठिकाण रायरेश्वर महादेव मंदिर बघण्याचा योग आला. भोर आणि वाई असे दोन्ही बाजूने जाता येते. दोन्ही ठिकाणी घाट चढावा लागतो. गडाच्या पायथ्याला गाडी जाते. तिथून वर ३०० पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या बाजूला लोखंडी रॉड आहेत आधार घेण्यासाठी. अगदी शेवटच्या कड्यावर चढण्यासाठी लोखंडी पायऱ्यांची शिडी बसवली आहे. गडाची उंची अंदाजे ४६००फूट ,आहे. मंदिराला जाताना वाटेत एक जिवंत झरा आणि त्यावर असलेले गोमुख – आणि पाण्याचे टाके आहे. या झऱ्याला बारा महिने पाणी असते आणि गडावरचे रहिवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात.जिथे शिवरायांनी शपथ घेतली ते स्वयंभू शंकराचे – रायरेश्वराचे पांडवांच्या काळातील पुराणकालीन मंदिर आहे. गाभाऱ्याचे खांब दगडी आहेत. आत गाभाऱ्यात प्रवेश करता येत नाही. फक्त रोज पूजेला येणाऱ्या गुरुजींना परवानगी आहे. मूर्तीचे पावित्र्य राखले जावे हा हेतू. शिवलिंग स्वयंभू आणि दगडी आहे. हात जोडताना, याच ठिकाणी आपल्या सवंगड्यांसोबत शिवबाने स्वराज्याची – हिंदूंच्या राज्य स्थापनेची शपथ घेतली याची जाणीव होते आणि एक भारावलेपण येते. अपार श्रद्धा, कृतज्ञता, अभिमान जागृत होतो मनामध्ये.त्या विचाराने अंगावर काटा उभा रहातो. बाहेर च्या भागात काळभैरवाची मूर्ती आहे इतरांना पूजा करण्यासाठी. खूपच प्रसन्न आणि थंड वाटते इथे दगडी बांधकाम असल्याने. मंदिराच्या समोर, महाराजांचा अर्धाकृती पुतळा आणि राजमुद्रा आहे. जवळ पास १२ किलोमीटर लांबीचे विस्तीर्ण पठार आहे. जैव विविधतेने नटलेल्या या पठारावर कारवी, सोनकी, चवल, तेरडा, मिकिमाऊस अशी अनेक प्रकारची रंगीत फुले, फुलपाखरे आहेत. सोनकीच्या पिवळ्या फुलांचा तर सुंदर गालिचा पसरलेला आहे. काही ठिकाणी मोठे मोठे, खूप वर्ष जुने, विस्तीर्ण पसरलेले वृक्ष आणि घनदाट जंगल आहे. त्या जंगलात अक्षरशः हरवायला होते कारण सगळया पाऊलवाटा सारख्याच भासतात. पांडवकालीन लेणी सुध्दा आहेत इथे आणि निसर्गाचा चमत्कार — सात रंगांची माती आढळते या पठारावर. इतक्या उंचीवर पोहोचल्यावर आजूबाजूला दिसणाऱ्या डोंगर रांगा खुणावु लागतात. चारही दिशा सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेल्या आहेत. राजगड, तोरणा, सिंहगड, केंजळगड, विचित्रगड, पुरंदर, नवरा नवरी चा डोंगर, महाबळेश्वर चे पठार , कमळ गड, एव्हढी गड मंडळी दिसतात — अर्थात हवामान स्वच्छ असेल तर. खालीच असलेले विस्तीर्ण धोम धरणाचे विहंगम दृश्य बघत रहावेसे वाटते. इथे जंगम समाजाची वस्ती आहे. मातीच्या भिंती बाहेरून सुबक बांधणीची कुडाने आच्छादलेली घरे . आत छान शेणाने सारवलेली जमीन . दुपारच्या उन्हात, आतमध्ये मस्त थंड होते. पंख्याची आठवण झालीच नाही. सगळी जंगमांची घरे, त्यातल्या एका घरी थांबलो जेवायला . निघताना भरपूर नाश्ता झाला असल्याने, आता इतक्यात भूक लागणार नाही असे वाटले होते पण इतके चढून गेल्यावर आणि पठारावर पायपीट केल्यावर कडाडून भूक लागली. जंगम समाजामध्ये मांसाहार आणि अपेयपान वर्ज्य आहे. शिवबाने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले, स्वराज्याच्या स्थापनेचे , स्वयंभू शंकराचे पांडव काळातील मंदिर असलेले, हे ठिकाण, हे लोकं खूप पवित्र मानतात. त्यांची तशी श्रद्धा आहे. येणारे पर्यटक, दुर्गप्रेमी त्याचा आदर करतात. त्या घरातील वहिनीने गरम गरम भाकरी, वांग्याचे भरीत, पापड, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दही —- असे छान सजवलेले पान वाढून आणले. तुटून पडलो त्यावर. वांग्याचे भरीत तर अप्रतिम होते. घराच्या पाठीमागेच त्यांचे शेत होते. बहुतेक करून गहू पिकवतात तिथे. आम्हाला जेवायला वाढून ती वहिनी शेतात गेली काम करायला. बाकीची मंडळी आधीच गेली होती. थोड्या वेळाने पाहिले तर वहिनी चक्क ट्रॅक्टर चालवत होत्या. शिड्यांच्या रस्त्यावरुन, ट्रॅक्टर चे सगळे भाग सुट्टे करून वर चढवले आणि नंतर जोडले होते. खूप लहरी निसर्ग, भणानता वारा, भरपूर पाऊस, उघडे माळरान, कसल्याच आधुनिक सोयी नाहीत, ( वीज आली आहे पण बेभरवशी, मोबाईल पण आले आहेत ) , उणीपुरी दहा बारा घरं, स्वतः पुरती शेती – दुधसाठी म्हशी पाळणे, पठारावरचा भरपूर मोकळा वारा छाती काठोकाठ भरून घेणे — स्वच्छंदी, बिनधास्त आयुष्य जगणे. कठीण वेळेला डॉक्टर तर नाहीच पण गरजेच्या गोष्टी आणण्यासाठी सतत शिड्यांच्या – जराशा अवघड वाटेने खाली उतरणे —— किती कष्टप्रद आयुष्य. पण खूप सुखाने जगत आहेत. साधे पण नैसर्गिक पद्धतीने पिकवले पोष्टिक अन्न खाऊन शरीर काटक झाले आहे. आपण काही तासा पेक्षा जास्त कल्पनाच करू शकत नाही अशा जीवनाची. मला मनापासून असे वाटते की, शहरी – सुखवस्तू – निर्जीव – माणसाचे मशीन झालेल्या आयुष्याची ( झळ ) चटक त्यांना लागुच नये. त्या पठारावर असताना मला
” गो. नी. दांडेकर यांच्या ” माचीवरला बुधा ” या कादंबरीची आठवण झाली. त्यातला” बुधा ” असाच मुलाच्या घरी शहरी आयुष्याला कंटाळून परत त्याच्या माचीवरच्या घरी एकटाच रहायला जातो. त्यात त्या माचीचे वर्णन असेच केले आहे —– या रायरेश्वर च्या पठारासारखे. यावरूनच सुचले असेल का , कदाचित
गो. नी. दा.ना .
शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या, निसर्गाची जैव विविधता लाभलेल्या या नितांत सुंदर ठिकाणाच्या ,
रायरेश्वराच्या दर्शनाने मंत्रमुग्ध केले.
याच परिसरात असलेले, मांढरदेवी — काळूबाई चा डोंगर —- पवित्र स्थान. ( इथे पण घाट चढावा लागतो. भोर च्या रस्त्याने गेले तर घाटात रस्त्याचे काम चालू आहे सध्या त्यामुळे वाट अवघड झाली आहे. किंबहुना रस्ता नाहीच आहे. आम्हाला माहीत नसल्यामुळे जरा अवघड परिस्थिती झाली —- ड्रायव्हिंग स्किल पणाला लागले. एकदा पुढे गेल्यावर वळायला जागा नव्हती घाटात म्हणून पुढे गेलो. सावधान करणारे फलक लावणे आवश्यक आहे सुरुवातीलाच.देवीची कृपा होती. वर पोचलो सुरक्षित. उतरताना वाई च्या रस्त्याने उतरलो. ) धोम धरणाच्या पाण्यात बोटिंग, नाना फडणवीसांचा प्रशस्त वाडा – आतील कोरीवकाम, सदर , खलबतखाना, झोपायचा पलंग, वरती छताला हलणारा पंखा, १०० लोकं एकावेळी पंगतीला बसतील इतकी जेवायची जागा, बायकांची – स्वयंपाकाची – बाळंतिणी ची खोली ( खूप छान आहे. इथेही डागडुजी चे काम चालू आहे. पण नानांची महती आजच्या पिढीला समजण्यासाठी —- त्यांचे पेशव्यांच्या दरबारातील स्थान, हुशारी, त्यांचे काम – मुत्सद्देगिरी या सगळ्याचे चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून – slide show मधून, माहितीचे फलक लावून —– वर्णन केले गेले पाहिजे. काम चालू आहे – खूप काही होणे गरजेचे आहे. ) तसेच वाईचा ढोल्या गणपती —- हे मंदिर १७६२ साली बांधले असा उल्लेख तिथे आहे. अतिशय सुंदर विस्तीर्ण असा घाट बांधलेला आहे. दोन सुंदर दगडी दीपमाळ आहेत. इथेच काशिविश्र्वेश्र्वराचे ही मंदिर आहे. हे सगळे बघण्यासारखे आहे.
one night stay ची, छोटी ट्रीप करायची होती. “दूर्गमल्हार ” च्या श्री. विवेक पाटील सरांना फोन केला की तुम्ही काही सुचवाल का, आणि त्यांनी ही ट्रीप सुचवली आणि व्यवस्थित plan करून दिली.
अशी, अचानक ठरून योग आलेली, जरा वेगळी —
भोर ची one day – short ट्रीप लक्षात राहील अशी झाली.
@ शलाका जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these