” भाद्रपद पौर्णिमा – दुग्ध शर्करा योग ”
गिरनार ‘ एक पवित्र आणि जागृत देवस्थान !
साक्षात दत्त महाराज सदेह असताना अंतर्धान पावले त्यावेळचे ते पावलांचे ठसे आहेत. अशा चरणकमलाचे आणि अखंड धूनीचे दर्शन एकच वेळी होणे हा ‘ दुग्ध शर्करा’ योग यावेळी जुळून आला तो दुर्गमल्हार मुळे !
गिरनार चा उत्तुंग पर्वत म्हणजे भाविकांचे श्रद्धा स्थान ! १०००० पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. आता रोप वे आहे. आमच्या पैकी काही जण चालत तर काहीजण रोपवे ने चढले. हा रोपवे म्हणजे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब २३२० मीटर लांबीचा रोपवे आहे. ८ मिनिटांत आपण ५००० पायऱ्यांचा टप्पा पार करून अंबा माता मंदिरापर्यंत पोचतो. त्यापुढील टप्पा मात्र चालतच !
‘ पंगू लंघयते गिरीम l’
याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर या यात्रेत आले. अढळ श्रद्धा आणि परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्यांना ही गिरनार यात्रा घडते , दर्शन होते आणि अनुभूती येते. या वेळी २ वगळता सर्वच प्रथम आले होते. त्यातही पायाचा, गुढ ग्याचा त्रास असणारे होते परंतु दर्शना ची ओढ होती, श्रद्धा होती आणि म्हणूनच प्रत्येकाची यात्रा सफल झाली.
शेवटचा गुरुशिखराचा टप्पा पार केल्यावर गुरुचरणांचे दर्शन होताच मन इतके तरल होते की सारे श्रम सार्थकी लागतात.
‘ देवा सरू दे माझे *मीपण l
तुझ्या दर्शने उजलो जीवन ‘ ll
अशी अवस्था प्राप्त होते.
इथे कसलाच डामडौल नाही. झगमगाट नाही की जेवणाचे चोचले नाहीत. काही म्हणजे काही नाही. सर्व भक्त सारखेच . इथे देवापुढे ठेवलेल्या आणि देणगी दिलेल्या पैशांचा विनियोग होतो. केलेले दान सत्कारणी लागते आणि आपल्याला आत्मानंद, समाधान लाभते.
‘निघालो घेऊन दत्ताची पालखी ‘ म्हणणाऱ्या दुर्गमल्हार टीमच्या सहकार्याने , आस्थापूर्वक केलेल्या आखीवरेखीव नियोजनाने ही गिरनारयात्रा *”आनंदयात्रा ” झाली.
सद्गुरू कृपेने दुर्गमल्हारचे सर्वेसर्वा श्री. विवेक सर आणि त्यांचे सहकारी यांनी अशाच उत्तोरोत्तर आनंदयात्रा कराव्यात हीच सदिच्छा !
जय गिरनारी ! 🙏🏻
– मंगला कुळकर्णी