गिरनार यात्रा — १७ सप्टेंबर २०२४
खूप दिवस मनात होते गिरनार ला जाण्याचे पण जमत नव्हते . तो योग या सप्टेंबर मधल्या पौर्णिमेला जुळून आला. रविवारी १५ तारखेला रात्री हप्पा दुरांतो एक्स्प्रेस ने १६ तारखेला सकाळी राजकोट ला उतरलो. तिथल्या रेल्वे कॅन्टीन चा चहा कधीच विसरता येणार नाही इतका छान लागला. तिथून अंदाजे दोन तासांचा ( १०० km. अंदाजे ) बस चा प्रवास करून जुनागड मधे प्रवेश करते झालो. या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूला भुईमुग आणि कापसाची शेती बघायला मिळाली. दुर दूर पर्यंत शेती आणि वर स्वच्छ निळेशार आकाश- नजर जाईपर्यंत. जणू नभाने धरती ला कवेत घेतले आहे. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सह्याद्री ची डोंगर रांग सदैव सोबत करत असते पण इथे डोंगर काय साधा उंचवटा ही दिसत नाही. त्यामुळे नजर जाईपर्यंत नुसते विस्तिर्ण आच्छादलेले निळे आकाश डोळ्यांना सुखद वाटते. असेच कच्छ ला गेलो होतो तेव्हा जाणवले. जवळ जवळ दीड तासांचा प्रवास झाल्यावर अचानक क्षितिजावर पर्वतांची रांग दिसू लागली. आमच्या सोबत असलेली तन्वी म्हणाली काकू गुरुशिखर दिसायला लागले. आम्ही आश्चर्याने बघायला लागलो कारण सगळया परिसरात तेव्हढीच डोंगर रांग होती. उंच उंच तीन चार शिखर आणि काही छोट्या टेकड्या. बाकी सपाट प्रदेश. हे गिरनार चे पहिले दर्शन. काळया कातळा चे ते सरळ सोट शिखर लांबूनच बघितल्यावर मनात विचार आला, जमेल का इतके चढायला. १०,००० पायऱ्या आहेत असे समजले होते. त्यात आमच्या १४ जणांच्या gr मधे फक्त,आम्ही दोघच पायी जाणारे होतो, बाकी सगळ्यांनी ROPE WAY चे booking केले होते असेही समजले त्यामुळे हृदयात जास्तच पाकपुक व्हायला लागले . पण श्री. शिरीष जोशींचा पायी जाण्याचा निर्णय पक्का होता. मग मी पण निश्चय केला. ” दुर्ग मल्हार ” ने “भारती आश्रमात ” आमची व्यवस्था केली होती. जुनागड पासून २ km.च्या ह्या भागात वेगवेगळे आश्रम आहेत जिथे भक्तांची राहण्याची सोय केली जाते. भारती आश्रमाचा परीसर स्वच्छ रमणीय हिरव्या वृक्षांनी नटलेला आहे. सुमारे ३५ गिर गायी असलेली स्वच्छ गोशाळा, गरजू मुलांची आश्रम शाळा, भारती बापूंचे प्रार्थना स्थळ — तिथे male — female असे वेगवेगळे शंख ठेवले आहेत. एक शंकराचे देऊळ पण आहे. इथे अन्न छत्र पण असते. आमच्या खोली समोर उभे राहिले की समोरच काळ्या कातळातला उंच डोंगर मध्यावर जैन मंदिराचे पांढरे शुभ्र कळस, सतत दिसत होते — जणू विचारत होते, येणार आहेस ना……….
संध्याकाळी जुनागड मधले अक्षरधाम मंदिर पाहून, पटेल restaurant मधे गुजराती थाळी जेवलो. छान चवीचे, उत्कृष्ट unlimited जेवण तिथल्या लोकांनी वाढले. तिथले श्रीखंड, काजू करेला भाजी, ताक हे पदार्थ मला आवडले. रात्री गिरनार चढायचे होते त्यामुळे कमीच जेवण केले.
गंमत अशी होती की १७ तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा उशिरा, म्हणजे पावणे बारा ला लागणार होती म्हणून रात्री न निघता पहाटे लौकर निघावे का अशी चर्चा सुरु झाली पण एकदा रात्री निघायचे ठरल्यावर आता झोप येणे कठीण होते. मग शेवटी रात्रीच एक वाजता निघायचे नक्की झाले.
आम्ही दोघं – मी आणि माझे यजमान — देवाशिश नावाचा एक तरुण मुलगा आणि दुर्गमल्हार ची आमची gr leader तन्वी, असे चौघ निघालो. यात आम्ही दोघे ” पहिलटकर ” आणि तन्वी आणि देवाशिष ” repeater “. आमची बाकीची मंडळी, विवेक सरांबरोबर दुसऱ्या दिवशी rope way ने येणार होती.
पहिल्या पायरीवर, नारळ वाढवून कापूर उदबत्ती लावून, दत्त महाराजांची प्रार्थना केली आणि चढायला सुरुवात केली. सुरुवातीला १२०० पायऱ्या चढे पर्यंत खूपच उत्साह होता. गप्पा ना रंग चढला होता. मधे पायऱ्यांचा रस्ता आणि दोन्ही बाजूला घनदाट जंगल. रातकिडे कराओके वर रंगात येऊन गात होते. पौर्णिमेचे चंद्र बिंब, झाडांच्या पानामधून धवल प्रकाश पाझरत होते. चालायला तेव्हढे पुरेसे होते. आमच्या आवाजा शिवाय बाकी सगळे शांत होते. निद्रावस्थेत गेलेल्या निसर्ग राजाच्या राज्यात, आमच्या आवाजा मुळे व्यत्यय येत असेल कदाचित. झाडांचा एक वेगळाच वास दरवळत होता. हळू हळू लक्षात आले की आम्हा चौघांशिवाय कोणीच नव्हते रस्त्यावर. पौर्णिमा दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा सुरू होत असल्यामुळे असेल कदाचित. मधेच खूप लांबून आल्यासारखा , एक वेगळाच आवाज आला. मी विचारले कसला आवज आला तर पक्षाचा असेल असे म्हणून श्री. जोशींनी विषय बदलला. इतक्या रात्री कुठला पक्षी जागा आहे असा विचार आला मनात पण चालण्याच्या नादात विसरले. दुसऱ्या दिवशी कळले की काल जंगलात शिकार झाली होती. थोड्या वेळाने, साधारण २/२.३० वाजता एक टपरी दिसली. बंद होती पण ती.तन्वी म्हणाली, उठवू या आपण ‘ गोबर चाचा ‘ ना, आमचा नेहमीचा टप्पा आहे हा. पण एक दोन वेळा हाक मारून ते उठले नाहीत. मग जाऊदे कशाला एव्हढ्या रात्री त्यांना त्रास म्हणून पुढे गेलो. नंतर लक्षात आलं की पाणी फारच थोड उरलं आहे म्हणून परत मागे आलो आणि जरा जोरात हाक मारून त्यांना उठवले. त्यांनी पण इतक्या रात्री उठून आम्हाला लिंबू सरबत करून दिले. असे energy booster घेउन आमची चौकडी पुढे निघाली. पुढे ही छोट्या टपऱ्या लागल्या पण सगळया झोपेच्या आधीन झाल्या होत्या. आता झाडी विरळ होऊन कातळ सुरू झाला. उंचावर आल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला. आकाशात पांढऱ्या ढगांची वेगाने वर्दळ सुरू झाली. चंद्र बिंब सारखे गुप्त होऊ लागले. ” चांदोबा चांदोबा भागलास का, ढगांच्या पांघरुणात लपलास का ” असे म्हणायची वेळ आली. टॉर्च ची गरज भासू लागली. सगळा आसमंत धूसर झाला. मागे काय सोडून आलो आहे आणि पुढे काय वाढून ठेवलंय याबद्दल पूर्ण अद्यान होते. त्यामुळे किती झाले – किती राहिले —— अज्ञानात आनंद असल्यामुळे पायऱ्या नेतील तिकडे जात होतो. सोबत गप्पाष्टक चालूच होती. एकीकडे देवाशिष चा ,
” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ” चा u tube channel अखंड सुरू होता. जमेल तितके आम्ही त्याला साथ देत होतो. म्हणता म्हणता ” जैन मंदिर ” आले. पण धुक्या मुळे काहीच दिसत नव्हते. मंदिराचा संपूर्ण परीसर धूसर होता. डोक्यावरचे केस आणि कपडे दवाने चिंब भिजले होते. इथे पहिल्यांदाच एक मुलांचा gr भेटला. पण थोड्याच वेळात सर सर पुढे निघून दिसेनासा झाला. आमची चौकडी पुढे निघाली. बाजूच्या तुरळक झाडांवरील पाणी अंगावर पडल्यामुळे, पाठीवरच्या सॅक मधून रेनकोट काढावा की काय अशा विचारात चालत राहिलो. आता आकाशात पण काळ्या ढगांची उपस्थिती वाढली होती. थोड पुढे गेल्यावर एक structure दिसले. तन्वी म्हणाली, काका काकू अंबाजी मंदिर आले. आम्हाला गड सर केल्याचा आनंद झाला, कारण विवेक सर म्हणाले होते, अंबाजी ला पोचलात की जिंकलात. मंदिर बंद असल्यामुळे परत येताना दर्शन घ्यायचे ठरवून पुढे निघालो. आता पुढची वाट अवघड चढणीची. उभा कातळ चढायचा होता. आत्ता पर्यंत पायांना सवय झाली असल्यामुळे ते आपोआप पुढे पडू लागले. इथे थोडा दम लागत होता चढण असल्यामुळे. थांबत थांबत, कधी बाजूच्या कठड्याचा आधार घेत चौकडी पुढे चढत होती . मधून मधून गप्पा आणि देवाशिष चे अवधूत चिंतन…… u tube chanel – अखंड नामस्मरण……. चालू होते. त्या मुळे शारिरीक कष्ट जाणवत नव्हते. मनाचा उत्साह टिकून होता.
अचानक वाऱ्याचा वेग जरा वाढला आणि काळ्या ढगांच्या अंगात पण मस्ती संचारली. ती मस्ती बघत बघतच ” गोरखनाथ मंदिरात ” पोचलो. आत शेड मधे जाऊन जरा निवांत उभे राहिलो. देऊळ बंद होते. बाहेरची, वारा – ढगांची मस्ती आता, शेड मधून अनुभवत होतो. थंडीने गारठून गेलो होतो. सकाळचे ५.३० वाजले होते तरी अजून उजाडले नसल्याने बाहेर अंधारच होता. आम्हाला पाहून तिथल्या महाराजांनी देऊळ उघडले. आरती केली, धूनी पेटवली. खूपच सुरक्षित वाटले . एक वेगळाच अविमरणीय अनुभव होता तो. एका वेगळ्याच उत्साहाने भारावून गेलो. खरंच त्यावेळची मनाची अवस्था शब्दात वर्णन नाही करता येणार. ती अनुभवावी लागेल. आरती झाल्यावर गोरख नाथांच्या पादुकांचे , काळभैरवाचे दर्शन घेऊन तिथून बाहेर पडलो. अजून एक ७/८ जणांचा gr भेटला. आता पुढे अजून वाटचाल करायची होती. आश्चर्य म्हणजे बाहेर सगळे शांत झाले होते. वारा आणि ढग दोघेही लहान मुलांसारखे थकून गप्प झाले होते बहुतेक . आता खाली उतरायचे होते. पण पाय रुसून बसले कारण इतका वेळ चढायची सवय झाली होती त्यांना. आता अचानक रिव्हर्स गियर टाकायला पट्कन जमेना त्यांना. काठीचा आधार घेत एक एक पाऊल खाली टाकायला सुरुवात झाली. इथे काठी चा खूपच उपयोग झाला. आता समोर आकाशात लालसर छटा पसरू लागली होती आणि समोर ” गुरुशिखर” पण दिसायला लागले. जवळ जवळ १५०० पायऱ्या उतरून खाली , गुरुशिखराच्या प्रवेश द्वारा जवळ पोचलो. इथून पुन्हा ७०० पायऱ्या चढल्यावर शिखरावर पोचणार. आता पूर्ण उजाडले होते. भक्तांची संख्या ही वाढली होती. इथे थोडे relax झालो कारण हत्ती गेला शेपूट राहिले अशी अवस्था होती. प्रवेश द्वाराच्या कमानी खाली जरा फोटो काढले. पहिल्यांदाच उजेडात फोटो मिळाले. शेवटचा पडाव चढायला सुरुवात केली. जरा जास्तच उभा चढ होता पण काहीच वाटत नव्हते कारण लक्ष समोर दिसत होते. थोड्या पायऱ्या चढल्या आणि समोर डोळ्याचे पारणे फिटनारे दृश्य दिसले. सुंदर असा सूर्योदय झाला होता. अवती भवती पांढरे ढग स्वैर संचार करत होते. जणू निळ्या आकाशी चादरी वर कापूस पिंजून ठेवला आहे. बरोबर ६.५० मिनिटं झाली होती. आम्ही गुरुशिखारावर मंदिराच्या समोर उभे होतो. १०/१५ भक्तांची लाईन लागली होती आमच्या पुढे. मंदिर अजून उघडले नव्हते. बरोब्बर ७ वाजता आरती होऊन मंदिर दर्शनासाठी उघडले. एक एक करत आता गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि समोर मंत्रमुग्ध होऊन पाहू लागलो. ह्याच साठी केला होता अट्टाहास…….. दत्तगुरु नी १२००० वर्ष तप केले ती ही जागा. दत्त गुरूंचा वास असलेले, स्वयंभू स्थान. त्या पवित्र पादुकांचे दर्शन झाले. दत्त गुरूंची अतिशय रेखीव सोज्वळ मूर्ती डोळ्यात किती साठवू असे झाले. डोळे पाणावले. एक प्रकारचे भारावले पण मनात दाटून आले. गर्दी नसल्यामुळे मन एकाग्र करण्याचा थोडा प्रयत्न केला आणि…… मी – माझे – माझ्यामुळे…… हा सगळा अहंकार, मी पणा तिथेच सोडता यावा, मोह मायेचा त्याग करता यावा… अशी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना दत्त गुरूंच्या चरणी केली. मुलांनसाठी चांगले निरोगी आयुष्य मागण्याचा मोह आवरता आला नाही. परंतु जे होईल ते चांगल्या साठीच होइल आणि दत्त गुरू जे करतील ते चांगल्या साठीच…… हा पूर्ण विश्वास आहे. दर्शन करून खाली उतरलो. सुमारे पाच तासात यात्रा पूर्ण झाली. प्रवेशद्वारा शी आल्यावर परत खाली १७० पायऱ्या उतरून खाली गेले की तिथे अखंड धुनी पेटवली जाते ते ठिकाण आहे. तिथेच अन्न छत्र, गेले कैक वर्ष, चालवले जाते. तिथे शिरा आणि ढोकळा असा प्रसाद घेतला. परतीचा प्रवास rope way ने करायचे ठरले होते. तरी पण, गोरख नाथांच्या मंदिरा चा चढ चढणे आणि अंबा माता मंदिरा पर्यन्त उतरण, हे दोन्ही पडाव पार केले. अंबा मातेचे दर्शन घेऊन rope way ने खाली आलो. परत पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. सकाळचे नऊ वाजले होते. इथे गिरनार यात्रा संपूर्ण झाली.
जेव्हा यात्रेला सुरुवात केली तेव्हा जमेल की नाही अशी मनात धाकधूक होती. पण दत्त गुरू नीच बळ दिले चढण्यासाठी आणि वर पर्यंत नेले.आता यात्रा पूर्ण झाल्यावर एक आंतरिक समाधान घेउन परत आलो आहोत. पुन्हा जमेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. दत्त गुरू जशी बुध्दी देतील तसे होइल हा विश्वास आहे.
दोन ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे —- वर गुरू शिखरावर जे अखंड अन्न छत्र चालवले जाते, त्याचे सगळे सामान खालून सेवेकरी स्वतः च्या पाठीवर उचलून, ८/१० तासांचा प्रवास करून कठीण चढ चढून वर आणतात. हे प्रत्यक्ष बघितले. rope way मधून सामान न्यायला परवानगी नाही. तर त्या सेवेकऱ्याना मनापासून धन्यवाद.
दुसरे म्हणजे —- आमच्या सोबत असणारे तन्वी आणि देवाशिष हे दोघं. पूर्ण प्रवासात ते सतत आमच्या speed बरोबर adjust करत होते. आम्हाला सोडून जराही कुठे गेले नाहीत. तन्वी चे विशेष आभार कारण ती प्रचंड confidant होती पूर्ण वेळ. तिच्या वर सगळा भार टाकून आम्ही पुढे पुढे जात राहिलो. जणू दत्त गुरू नी तिच्या माध्यमातून आम्हाला शिखरावर पोचवले.
दुर्ग मल्हार च्या विवेक सरांचे ही आभार.
तर अशी ही आमच्या पहिल्या गिरनार यात्रेची कथा सुफळ संपूर्ण.
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यावा. पायी च गेले पाहिजे असे नाही. आता Rope Way ची चांगली सुविधा आहे. त्याचा लाभ घेऊ शकतो आपण. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील. पण खऱ्या श्रध्देने जो भेटायला जातो त्यालार दत्त गुरू नक्कीच अनुभुती देतात.
जय गिरनारी.
शलाका शिरीष जोशी. पनवेल.