19 जून 2016 दुर्गमल्हार नावाचा ग्रुप कलावंतीण ला ट्रेक नेतोय म्हणून कळल. आम्ही 7,8 जण ह्या ट्रेकसाठी ह्या ग्रुपला जॉईन झालो. नवीन ग्रुप, माणसे कशी असतील काहीच माहीत नव्हत. ट्रेक लीडर विवेक पाटील नावाची व्यक्ती होती. सगळी मुले त्यांना शिक्षक म्हणून हाक मारत असल्याने आम्हीही त्यांना अहो जाओ करायला सुरवात केली. कारण सगळी मुले त्यांना जरा वचकून च होती. कोणत्या शाळेचे शिक्षक आहेत काही कळेना. मग कळल की ते शाखा चालवतात आणि ट्रेकला आलेली मुले शाखेतील होती. विवेक शिक्षकांनी आमच्या प्रत्येकाशी बोलून ओळख करून घेतली. आधी ट्रेक केलेत का वगैरे चौकशी झाली. ट्रेक भर हा माणूस धावपळ करत सगळ्यांना मॅनेज करत होता, सगळ्यांची वैयक्तिक काळजी घेत होता. मग कळल की त्यांना किल्ल्यावर नॉनव्हेज नेऊन खाल्लेलं ही चालत नाही कारण किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे मंदिर. आणि ह्या भावना असल्याने बाकीची व्यसन तर लांबच पण ग्रुप मध्ये मुली, स्त्रिया ह्यांनाही फार आदराने वागवले जात होते. ट्रेक पूर्ण झाल्यावर आणखी एक शॉक ह्या विवेक शिक्षकांनी दिला. ट्रेकच्या खर्चाचा पूर्ण हिशोब आम्हाला दिला व प्रत्येकी २ रुपये सुटे द्यायला नसल्याबद्दल दिलगीर ही व्यक्त केली. आणि आम्ही फक्त डोक्याला हात लावायचे बाकी होतो. एवढा प्रामाणिकपणा ? अशा गोष्टींची आपल्याला सवयच राहिलेली नसते ना.
अशी ही दूर्गमल्हार सोबत सुरवात झाली. त्या नंतर वर्षभर अधून मधून ट्रेक ही चालू राहिले. तो पर्यंत शिक्षक वरून विवेक म्हणण्या पर्यंत ओळख आणि माझे ताई वर प्रमोशन झाले होते. एक दिवस त्याने आपण जून २०१७ मध्ये गिरनार करायचं म्हणतोय तू येणार का विचारलं. बरेच दिवसांपासून गिरनार बद्दल ऐकून असल्याने मी लगेच हो म्हटल. मग सुरू झाला एक नवा प्रवास. गिरनार झाल्यावर विवेकने ट्रेक्स, टूर्सच्या विश्वात पाऊल टाकल. मला ही त्याने टूर लीडर म्हणून येशील का सोबत असे विचारले. विवेक वरचा विश्वास, त्याचा प्रामाणिकपणा, लोकांची काळजी घ्यायची वृत्ती, सतत लोकांना उत्तम द्यायचा ध्यास ह्यामुळे मी ही दुर्गमल्हार परिवारात सामील व्हायला लगेच होकार दिला. गेली 7 वर्ष मी टूर लीडर म्हणून अनेक टूर्स केल्या, अनेक ठिकाणे बघितली, गिरनारच्या वाऱ्या घडल्या त्या फक्त दुर्ग मल्हार मुळेच. अनेक माणसे जोडली गेली, अनेक जिवलग मिळाले ते ही दुर्ग मल्हार मुळेच. ह्या प्रवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विश्वासाने विवेकने भारतातल्या नाही तर बाहेरच्या टूर्स ची जबाबदारी ही माझ्यावर सोपवली. आता मागे वळून बघताना खूप छान वाटतंय. एक गृहिणी ते एक टूर लीडर हा प्रवास ही छान वाटतोय.
दर महिन्याला तुम्ही गिरनार ला जाता तुम्हाला कंटाळा नाही का येत असे ही प्रश्न विचारले जातात. पण दर वेळी येणारे क्लाएंट वेगळे असतात आणि टूर लीडर चे एकमेकांसोबत चे bonding एवढे छान आहेत की आम्ही सगळे हा प्रवास, ही जबाबदारी एन्जॉय ही करत असतो