एक संध्याकाळ गोबर चाचा आणि चाची सोबत…

430177753_7389303521116377_6943276250277166964_n.jpg

वास्तविक पाहता चाचा आणि चाची दर पोर्णिमेला किंवा दोन महिन्यात एकदा भेटतातच.. मात्र आजची भेट थोडी वेगळी होती…
गोबर चाचा व चाची सोबत परिचय होवून ७ वर्ष झाली. जेंव्हा गिरनार यात्रा चालू केली तेंव्हापासून.. गिरनारच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली की नकळत ओढ लागते ती म्हणजे, गोबर चाच्यांच्या १२०० पायरीवरच्या स्टॉलवर जावून सरबत पिण्याची. जसा चाच्या व चाचींचा स्वभाव, अगदी तशीच गोडी आणि स्वाद त्यांनी बनविलेल्या सरबताचा.. ह्यातूनच हे नात सहज आणि आपोआप घट्ट होत गेलं. घट्ट म्हणजे किती तर कधी स्टॉल बंद असेल आणि हे दोघं भेटले नाहीत तर चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागत.. असे हे चाचा आणि चाची.. प्रेमळ, काळजी घेणारे, आपले वाटणारे आणि बरच काही…
आज एक बॅच गिरनार, सोमनाथ व गीर जंगल सफारी करुन परत गेली आणि उद्या दुसरी बॅच येणार म्हणून आज थोडा आराम करण्याच्या उद्देशाने मी निवांत होतो. संध्याकाळी अस वाटल की, किती आराम करायचा म्हणून थोडा फेर फटका मारुन येवूया म्हणून बाहेर पडलो.. आधी भवनाथ मग अनुसूया माता मग लंबे हनुमान अशी दर्शन करत पहिल्या पायरीला येवून ठेपलो.. पायरीला नमस्कार केल्यावर वाटू लागलं की थोड्या पायऱ्या चढून येवू (किती ते ठरवलं नव्हत, असही गिरनार ला तुम्ही ठरवून काहीच होत नाही सर्व काही महाराजच ठरवत असतात असो). सुरुवात केली ५० झाल्या १०० झाल्या व पुढे पुढे चालू लागलो. तस बघायला गेलं तर पायऱ्या चढणं काही नवीन नाही माझ्या साठी.. महाराजांच्या कृपेने दर महिन्याला येतोय कधी कधीतर महिन्यात तीनतीन वेळा येतो.. पण नेहमी येतो ते ठरवून, आज असंच सहज आलो होतो.. जसं पायऱ्या चढू लागलो तस चाचा व चाची ला भेटूनच येवू अस वाटू लागलं. मी संध्याकाळी उशिरा निघालो होतो. त्यामुळे येताना अंधार होणार हे नक्की होतं त्यात सोबत रुमाल व मोबाईल सोडला तर काहीच नव्हत.. २० मिनिटात वर पोचलो तर चाची गुजरातीत चाचाला सांगत होती “थोडा इधर घुमावो, थोडा उधर घुमावो, थोडा नीचे, उपर” हे सगळं ऐकून मला खूप भारी वाटत होतं. बिचारा चाचा एका मोठ्या दगडावर चढून टीव्हीचा अँटिना सेट करत होता चाचीला सीरियल बघायची होती म्हणून. अखेर अँटिना सेट झाला मग मी दोघांना आवाज दिला व आधी पाणी द्या म्हटलं.. तस दोघानाही आनंद झाला.. व पाणी देता देताच प्रश्न चालू झाले. कारण डॉक्टरांनी मला थोडा आराम करा अस सांगितल्यामुळे ह्यावेळेस मी रोप वे ने वर गेलो होतो व ग्रुप सोबत रात्री चालत बाकीचे टूर लिडर गेले होते. त्यांनी चाचाला माझी तब्बेत बरी नाहीये म्हणून आला नाही असे सांगितले होते.
आणि तरी पण मी भेटायला वर आलोय हे बघून चाचा ओरडले सुद्धा.. मी म्हटलं “तुम्हाला भेटायला आलो. नेहमी आलो की ग्रुप असतो मग निवांत बोलता येत नाही” ह्यावर दोघेही अतिशय आनंदी झाले.. आनंद किती छोट्या छोट्या क्षणात असतो नाही. आवडती सिरियल सोडून चाचीने कधी सरबत बनवला कळाल पण नाही.. मग चाची टीव्ही समोर जावून बसली व चाचासोबत गप्पा चालू झाल्या .. मला फक्त चाच्याच्या तीन पिढ्या डोली वाहतात अस माहीत होतं आज मात्र चाचा म्हणाले “ये सीडियां तो हमारे खून में है.. दादाजी, पिताजी, मै, बिरजू (त्यांचा मुलगा)और पोता यही काम करते आ रहे है.. १५ वर्षाचे असताना चाचांनी बोजा न्यायच्या कामापासून सुरुवात केली मग डोली २९ वर्ष चालवली व आता गेली काही वर्ष दोघं पायऱ्यांवरच छोट्या घरात राहतात व दिवसरात्र आळीपाळीने, न थकता,न दमता येणाऱ्या जाणाऱ्याना चहा आणि सरबत बनवून देत असतात.. चाचा म्हणत होते आताचे डोलीवाले आळशी आहेत. वेळ पाळत नाहीत पैसे पण कधीकधी जास्त घेतात.. त्यांच्या वेळी म्हणे फक्त मोजके डोलीवाले असत. जर कोणी दिलेल्या वेळेच्या आधी १५ मिनिटे आला नाही तर त्यांचा प्रमुख त्याला १५ दिवस आराम करायची शिक्षा देत असे. तेंव्हाचे दर असे होते म्हणे. १ ते ५५ किलो १०५ रुपये, ५५ ते ७५ किलो १३५ रुपये आणि त्यापुढे चार जणांची पालखी २३० रुपये .. ह्यात १० हजार पायऱ्या चढायच्या, सर्व दर्शन करून परत १० हजार पायऱ्या उतरायच्या.. चाचा सांगत होते जर कोणी चुकून २ रुपये जरी ग्राहकाला जास्त मागितले आणि त्या प्रमुखाला कळल तर त्या डोलीवाल्याच काही खरं नाही. अशी शिस्त होती म्हणे आणि चाच्यांना त्याचा भयंकर अभिमान आहे.. ते म्हणतात मी जे काही केलं ते केवळ महाराजांमुळे, ह्या पायऱ्यांनीच सर्व काही दिलय. अस सांगताना ते भूतकाळात गेले. म्हणाले एक काळ होता की गावातील लोक आम्ही दिसलो की तोंड फिरवायचे आणि आज मी पाहिलं नाही तरी हाक मारतात.. काय आणि किती लिहू नुसत सांगत होते व मी ऐकत होतो.. ह्या सर्व स्वतःच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीच क्रेडिट ते महाराजांना आणि पायऱ्यांना द्यायला विसरत नाहीत.
मी म्हटलं ह्या रोपवे मुळे कधी कधी आपली भेट होतंच नाही आणि तुमचा धंदा पण कमी झालाय ना. तर हा माणूस म्हणतो कसा “ विवेक भाई जो इंसान चढ नही सकता, डोली को इतना पैसा दे नही सकता वो आज दत्त भगवान के दर्शन तो अच्छे से ले रहा है ना, हमारे हिस्से मे जो लिखा है वो तो मिल ही रहा है ना.. काय बोलू ह्या माणसाला मला काही कळत नव्हत.. इथे अजून हवंय म्हणत दिवस रात्र पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चाललेली चढावोढ कुठे आणि हा घनदाट जंगलात वयाच्या ६६ व्या वर्षी माझा जन्मचं मुळी ह्या पायऱ्यांची सेवा करण्यासाठी आहे, अस म्हणून आजही कोणतीही तक्रार न करता हे दोघं जीवन जगत आहे.. अंधार पडायला सुरुवात झाली होती म्हणून मी चाच्यांना म्हटलं येतो. परत भेटू, तर हात धरून म्हणाले, खाना तो खाके जावो. अभी चाची बनायेगी. हा स्नेह, हे प्रेम व आपलेपणा पैसे देवून तरी मिळेल का हो? मी म्हटलं पुढच्या वेळी नक्की येईन चाचींच्या हातची खिचडी खायला.. आणि निघालो.. चाचा व चाचींच्या विचारात काळोखात आणि निर्जन वातावरणात १२०० पायऱ्या कधी उतरलो कळलेच नाही..
ह्या चाच्यांनी आमच्यासाठी व आमच्या सारख्या अनेक लोकांसाठी किती केलंय ते कसं सांगणार, मी तर ज्यांना खूप दम लागलाय किंवा काही त्रास होतोय अश्या सर्वांना केवळ चाच्याच्या विश्वासावर तिथे ठेवून पुढे जायचो. चाचा त्यांची सगळी काळजी घ्यायचे . डोली करून द्यायचे. प्रसंगी आजारी असलेल्याची आम्ही खाली येई पर्यंत काळजी घ्यायचे मग ती मुलगी असो की मुलगा की स्त्री / पुरुष.. त्यांचा सर्वांप्रती एकच भाव…
समाजात सभ्यतेचा बुरखा घालून, खोट्या आपलेपणाची नाटक करणारे व दाखवण्यासाठी भक्तिभाव मुखावर आणणारे प्रसिद्धीच्या झोतात येतात व लोक त्यांना आदर्श मानतात.. खूप काही न शिकलेले चाचा व चाची जी नीती मूल्य जपतात, जो आपलेपणा आणि सेवाभाव सर्वांप्रती एकच ठेवतात तो खरच माझ्यासाठी एक आदर्श आहे आणि जीवन जगण्यासाठी एक फार मोठी प्रेरणा..
मोठमोठी पुस्तक वाचुन, तत्ववेत्त्यांच चिंतन ऐकून, भाषणं ऐकून जे कळणार नाही, जे समजणार नाही ते अश्या अती सामान्य व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात राहून नक्कीच उमजेल .. मला तरी अस वाटतं..
विवेक पाटील..
दुर्गमल्हार ट्रेक्स & टूर्स.
बदलापूर..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these