आमची आनंद सहल …..
गेले सहा महिने एक सारखं मनात येतं होतं कि ‘गोंदवले’ येथे जायला पाहिजें,आणि मागील आठवड्यातच तो योग जुळून आला.आमच्या तळेगावच्या मित्राने त्यांच्या बदलापूर ग्रुपच्या ट्रीपला येण्याविषयी विचारले, ही ट्रीप गोंदवले आणि काही ठिकाणे अशीच असल्याने लगेचच होकार देऊन आम्ही शनिवारी सकाळी रवानाही झालो.
जाताना वाटेवर एक ऐतिहासिक ठिकाण ‘बारा मोटांची विहीर ‘जी पुणे सातारा रस्त्यावर, लिंब या गावात आहे,तिथे थांबलो.हि एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू .ज्याला विहिरीतून पाणी काढण्यासाठी बारा मोटा एकावेळी लागतील अशी व्यवस्था होती.तेथील स्थानिक रहिवास्याने ह्या कधीही न आटलेल्या विहिरी विषयी इत्यंभूत माहिती आम्हाला दिली.सुमारे ३०० वर्षांपूर्वी श्रीमती विरुबाई भोंसले यांनी मुलतः आमराई च्या सिंचनासाठी सदर विहिरीची बांधणी केली.विहिरीचा व्यास ५० फुटी तर तर खोली १०० फुटाच्यावर (सध्या त्यात ५० फुट पाणी आहे),आकार अष्टकोनी,शिवलिंगा सारखा असून बांधकाम हेमाड पंथी पद्धतीचे आहे.विहिरीला प्रशस्त पायऱ्या ,पूल व बसण्यासाठी जागा आहे.गणपती,हनुमान,कमलपुष्पे, यांची शुभ शिल्पचित्रे तर सिंह आणि वाघ LIGER यांचे मिश्र शिल्प आहेत.तिथल्या बैठकीच्या जागेचा वापर शाहू महाराजांची गुप्त खलबतं व सल्ला मसलत, विश्रांती यासाठी केला जात असे.स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेली हि विहीर पाहून झाल्यावर बाजूलाच असलेल्या ‘मृदगंध ‘या गावरान मराठमोळ्या उपहार गृहात आपले पणाने वाढलेले सुग्रास भोजन करून पुढे औंध संस्थानातील .छ.शिवाजी महाराज आणि बहुसंख्य मराठा कुटुंबाची कुलदेवता असलेल्या यमाई मातेचे दर्शन घेण्यासाठी यमाई मंदिराकडे कूच केले . वळणा वळणाच्या चढत्या रस्त्याने पायपीट करून किल्ल्यासारखी तटबंदी असलेल्या शिव पार्वतीचे एकत्रित पुजल्या जाणाऱ्या या शक्तीपीठ मंदिरात पोहोचलो.काळ्या पाषाणात असलेली सुमारे सहा फुटी बैठी मूर्ती पाहून तिच्या शक्तीची व भव्यतेची जाणीव होत होती. यमाई देवी पार्वतीचे रूप असल्याने समोर नंदी देखील होता.येताना १०० वर्षापूर्वी बांधलेल्या आत्ताही सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांवरून उतरलो ,चहापान करून गोंदवल्याच्या दिशेने निघालो .संधाकली ७.३० च्या सुमारास तेथील हॉटेल वर पोहोचलो.थोडं फ्रेश होऊन लगेचच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी दर्शनास गेलो.अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न शांत वातावरण व निवांतपणे झालेले दर्शन यामुळे मन सुखावले.रात्री लवकर झोपी गेलो कारण पहाटे लवकर काकड आरतीला जायचे होते.लहानपणी आजीबरोबर काकड आरतीला गेलो होतो,त्या नंतर इतक्या वर्षांनी हा योग जुळून आला.’काकडा झाला आता मुख प्रक्षाळा ‘ या पंक्तीचा अर्थ आरतीनंतर ताज्या लोण्याच्या स्वरूपात मिळालेल्या प्रसादाने समजला.थोडा वेळ त्या परिसरात व्यतीत करून,सकाळची न्याहरी केली,व परतीच्या प्रवासाला लागलो.
वाटेत भोंसले घराण्याचे कुल दैवत असलेल्या डोंगरावरील शिखर शिंगणापूर च्या शंभू महादेवाला भेट दिली.सुमारे ३०० पायऱ्या चढताना थोडी दमछाक झाली.काळ्याशार दगडांची चिरेबंदी,पाच शृंगारीत मोठे नंदी ,दोन शिवलिंगे असलेले,आकर्षक रंगातील हे मंदिर खूप जुने आहे आणि सध्या असलेले देऊळ शहाजी महाराजांनी बांधलेले असून त्याचे नुतनीकरण १९७८ साली रामस्वामी या दक्षिणात्य स्थापत्य तज्ञाने केले.शंकर पार्वतीचा विवाह याच ठिकाणी चैत्र शुद्ध अष्टमीला झाला अशीही एक आख्यायिका ऐकण्यात आली.
वाटेत साताऱ्याच्या जवळच असलेल्या क्षेत्र माहुली या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला भेट दिली.तिथेही थोडा पायाला व्यायाम द्यावा लागला.कृष्णा व वेण्णा या दोन नदींच्या संगमावर वसलेले क्षेत्र माहुली,तेथील रामेश्वर शंकराचे सुंदर बांधकामाचे मंदिर,त्रिपुर लावण्यासाठीचा उंच स्तंभ ,थोडी तिरकस असलेली नंदीची मोठी मूर्ती आणि बाजूला घाट बांधलेल्या नदीचा आधार…छान दृश्य होतं.संगमाच्या पलीकडेही विश्वेश्वराचे पुरातन मंदिर होते. क्षेत्र माहुली हे रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्म गाव,दुसरा बाजीराव व इंग्रज सेनानी माल्कम यांची भेट आणि त्यांच्यातील तिसऱ्या निर्णायक युद्धपूर्व बोलणी येथेच पार पडली असे ऐकण्यात आले,चित्रीकरणासाठी योग्य नैसर्गिक वातावरण या मुळे काही मराठी/हिंदी सिनेमांचे शुटींग झाल्याचे कळले.सातारच्या बायपास वर असलेल्या ‘सुखश्री’ या त्याच दिवशी संध्याकाळी उदघाटन होणाऱ्या नव्या कोऱ्या हॉटेलात दुपारच्या मन भावन जेवणाचा भरपेट आस्वाद घेतला.
दोन दिवस ,नवीनच परिचय झालेला असूनही अजिबात नवखेपणा /औपचारिकपणा न बाळगता या नव्या ग्रुपने आम्हास सामावून घेतले. नवीन ओळखी झाल्या,विस्तारित कुटुंबाची अनुभूती मिळाली.समवयस्क,समविचारी माणसांच्या सहवासात दोन दिवस आनंदाचे क्षण वेचण्यात गेले.हल्लीच्या धकाधकीच्या व फावल्या वेळात आभासी दुनियेत मग्न असणाऱ्या आपणासाठी हा एक स्वागतार्ह बदल (WELCOME CHANGE) होता.दुर्ग मल्हार या सहल आयोजकांनी व्यवस्था चोख ठेवली होती.आणि बदलापूरकरांनी सहलीचे सुंदर व छान नियोजन केले होते.दर वर्षी अश्याच सहलीच्या निमित्ताने पुनर्भेटी चा वादा करत, तळेगावला येण्याचे आमंत्रण देऊन टोलनाक्यावर समस्त बदलापूरकर मंडळींचा निरोप घेतला. 🙏🙏
प्रदीप वैद्य …. २७/०२/२०२३