दरी खोऱ्यांचा अनुभव पाठीशी घेऊन हिमालयीन ट्रेक करायला जाणार असाल तर ठीक आहे. पण आयुष्यातील पहिलाच ट्रेक थेट हिमालयात करणं म्हणजे आगाऊपणा केल्यासारखं होतं. पण जायचं हे पक्कं होतं. दुर्ग मल्हार ट्रेक्स अँड टूर्स यांच्या सोशल मीडिया पेज वर हर की दून या हिमालयीन ट्रेक विषयी माहिती मिळाली. हर की दून हा हिमालयात पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्यांसाठी उत्तम ट्रेक मानला जातो. त्यामुळे सुरवात करण्याकरिता हा उत्तम पर्याय आहे म्हणून सगळं निश्चित केलं. माझ्यासोबत माझी मैत्रीण जागृती हिने देखील मला यायला आवडेल असं सांगितलं आणि सुरू झाला पहिल्या वहिल्या ट्रेकचा प्रवास…
मुंबई-दिल्ली-डेहराडून-सांकरी असं जायचं ठरलं असल्याने २३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठीचा प्रवास अखेर सूरु झाला. मुंबई-दिल्ली विमान प्रवास आणि दिल्ली-डेहराडून ट्रेनचा प्रवास असं करून डेहराडूनला पोहचलो. आणि मग सुरू झाला डेहराडून-सांकरीचा ८ -९ तासांचा घाटी प्रवास. उत्तराखंडमधल्या डेहराडूनपासून साधारणपणे १८० किलोमीटर तर मसुरीपासून १५० किलोमीटरवर सांकरी नावाचं छोटंसं गाव आहे, हे गाव म्हणजेच विविध ट्रेक्ससाठीचं बेस कँप. पुढचे काही दिवस त्याच्या (निसर्गच्या) अंगा खांद्यावर बागडायचं आहे, हे बहुदा त्याला ही कळलं होतं म्हणूनच सांकरीमध्ये आमचं स्वागत पावसाने झालं असावं. पण उतरलो त्यावेळी तिथे थंडी इतकी होती की, हातात मोबाइल सुद्दा राहात नव्हता. दुसऱ्या दिवशी पासून आमचा ट्रेक सुरू होणार होता. पण वर डोंगरावर बर्फवृष्टी झाल्याने आणि काही आकस्मिक घटना घडल्यामुळे, स्थानिक सरकारने पुढचे दोन तीन दिवस सगळया ट्रेक्स पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
आजूबाजूला जिकडे नजर पडेल तिकडे नुसत्या डोंगररांगाच असल्याने कुठला वेगळ्या ठिकाणी फिरायला जावं हा पर्यायच नव्हता. त्यामूळे पहिला दिवस असंच आजूबाजूची गावं, रस्ते फिरलो. दुसऱ्या दिवशी मात्र जखोल नावाच्या गावाला जाऊन तिथला एखादा छोटा ट्रेक करायचं ठरलं. लाकडी कौलारू घरं, चहूकडे हिमालयीन डोंगररांगा, छोटी खेळणारी मुलं, मोठमोठाली पाईनचे वृक्ष हे दृश्य कधीच न विसरता येण्यासारखं आहे. जखोलला छोटासा ट्रेक पूर्ण केला.
तिसरा दिवस उजाडला तो नवी आशा घेऊनच…
ट्रेकसाठी परवानगी तर मिळाली पण आमचा ठरलेला ट्रेक पाच दिवसांचा असल्याने तो तीन दिवसात करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे हर की दूनच्या ऐवजी केदारकंठ ट्रेक करायचं निश्चित झालं. साधारणपणे ८००० फूटांवर वसलेलं सांकरी गाव एकदा सोडलं की पुढे वीज नाही,
वस्ती नाही की मोबाइलला रेंज नाही,असतो सोबतीला फक्त चहुबाजूंना पसरलेला डोंगर. केदारकंठ ट्रेकचं साधारण अंतर १८- २० किलोमीटरचं आहे. आणि अनेक अडथळ्यांनंतर आमचा ट्रेक अखेर सुरू झाला. सहा-सात किलोमीटर नंतर आमचा पहिला बेस कॅम्प असणार होता. साधारण पाच – सहा तासानंतर आम्ही आमचा पहिला बेस कॅम्प गाठला. हिमालयात वातावरण पटकन बदलतं त्यामुळे बेस कॅम्प दुपार पर्यंत गाठणं आम्हाला आवश्यक होतं. जसा जसा सूर्य मावळतीला जाऊ लागला तशी थंडी चांगलीच जाणवायला लागली होती. आणि रात्रीची थंडी म्हणजे जेवण्यासाठी हातातील हातमोजे सुद्धा काढवत नव्हते. टेंट आणि स्लीपिंग बॅग मध्ये झोपण्याचा अनुभव खूप वेगळा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. ऍडव्हान्स बेस कॅम्पला जाताना जुदा का तालाव हे नयनरम्य ठिकाण लागतं. तळं, चहुबाजूंना मोठी डौलदार झाडं आणि निरभ्र आकाश हे सौंदर्य डोळ्यात न मावणारं होतं. इथे काही वेळ थांबून परत बेसकॅम्पच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. दोनच्या सुमारास आम्ही ऍडव्हान्स बेस कॅम्पवर पोहचलो.
ऍडव्हान्स बेस कॅम्पवरून मावळतीला जाणारा सूर्य याची देही याची डोळा बघणं म्हणजे स्वर्गसुख म्हणावं लागेल. हवेतला गारवा, मावळतीची किरणे बर्फाच्छादित डोंगरावर पडल्यावर दिसणारी सोनेरी छटा आणि शांतता हे कॉम्बिनेशन म्हणजे आहा !!! या शांततेतून देखील निसर्ग आपल्याशी संवाद साधत आहे असा भास नक्कीच होतो.
उद्याचा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा असणार होता. कारण ध्येय होतं केदारकंठाचं शिखर… त्यामुळे लवकर जेवणं उरकून आम्ही सगळे आठ वाजताच झोपलो. मध्यरात्री २ ला उठून, थोडंस खाऊन अडीच वाजता शिखर गाठण्याचा दिशेने आम्ही आगेकूच केली. आम्ही निघालो तेव्हा सर्वत्र अंधार होता… आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलो असल्याने, हा महिना काही बर्फवृष्टीचा नव्हता. पण आम्ही जसे शिखरच्या दिशेने पुढे वाटचाल करू लागलो तसं बर्फ चांगलाच दिसू लागला. शिखर जसा जवळ येत होतं तसं अंतर संपायचं नावच घेत नव्हतं. आणि अखेर दुर्ग मल्हारच्या सगळ्या मावळ्यांनी केदारकंठला गवसणी घातलीच…. १२,५०० फुटांवरून हिमालयाच्या डोंगराआडून वर येणारा सूर्योदय पाहायला मिळणं हा जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणावा लागेल. शब्द कमी पडतील पण निसर्ग त्याच्या सौंदर्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडवून आपल्याला नेहेमीच अचंबित करत राहातो एवढं मात्र नक्की…..!