अढळ निष्ठा, प्रबळ इच्छशक्ती, जिद्द आणि योग ही चतूर: सुत्री जुळून आल्याशिवाय यात्रा घडत नाही.
काही कामानिमित्त ‘ दुर्ग मल्हारच्या ‘ ऑफिस मध्ये गेले होते. अचानक ‘ अमरनाथ ‘ यात्रेसाठी मेडिकल चेकअप चा विषय निघाला. ‘ मेडिकल ‘ करून घेऊ असा विचार करून ‘ मेडीकल ‘ केली. यात्रेचे रजिस्ट्रेशन केले. तरीही ‘ अमरनाथ ‘ च्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे जावे की न जावे या विचारात असतानाच श्री. विवेक सरांचा फोन आला – आज विमानाची तिकिटे काढणार आहोत. येता की नाही ? जे होईल ते होईल असा विचार करून ८ जुलै ते १५ जुलै ‘२४ अमरनाथ वैष्णव देवी ला जाण्याचे नक्की केले.
७ जुलै रविवार – मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि सर्वत्र पाणी साठले. ८ जुलै ला सकाळी ८ वाजता विमानतळावर पोचायचे होते. आम्ही तिघे सकाळी ५-३० लाच गाडीने निघालो. सर्वच वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे. रेल्वे सेवा ठप्प, सर्वत्र पाणी साठलेले. विवेक सर टेन्शनमध्ये. सतत फोनवरून प्रत्येकाशी संपर्क साधून कुठपर्यंत पोचलात याची चौकशी करत होते. सुदैवाने सर्वच ८-१५ पर्यंत विमानतळावर पोचले.
लगेज, बोर्डिंग पास, सिक्युरीटी चेकिंग इत्यादी करून गेट वर पोचलो. अतिवृष्टीचा फटका विमान सेवेला ही बसला होता. ऐनवेळी गेट बदलले. परत धावपळ. त्या गडबडीतच गेटवर श्री संजय सराबरोबर सौ माधवी ताईंनी पाठवलेला केक कापून विवेक सरांचा वाढदिवस साजरा केला.
Air India चे १०-०५ चे विमान ११-३५ ला सुटले. १-४५ ला जम्मू एअपोर्ट – ‘जम्मू सिविल एन्कलव’ – इथे उतरलो. जम्मू कटरा टॅक्सी ने प्रवास करून कटराच्या ‘ अनुराग ‘ हॉटेलवर ४-३० वाजता पोचलो. इथेही तापमान ३५ डी होते .
‘वैष्णव देवी’ च्या मंदिरात जाण्यासाठी ‘ पर्ची ‘ ( ओळखपत्र ) घेणे आवश्यक होते. संध्याकाळी चहापान झाल्यावर परत हॉटेलमध्ये केक कापून श्री. विवेक सरांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर जवळच असलेल्या ऑफिस मध्ये जाऊन प्रत्येकाने आपले आधारकार्ड दाखवून ” पर्ची” घेतली. तिथले दिवसाचे तापमान बघता उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रात्री १०-३० वाजता दर्शनाला निघायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही सर्व १३ जण निघालो. गेट पर्यंत रिक्षा ने गेलो.
काश्मिर मधील सर्वच मंदिरे सुरक्षित तेच्या दृष्टीने सैनिकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी चेकिंग आणि ‘ पर्ची ‘ स्कॅन होते.
प्रत्येकाची तपासणी झाल्यावर गेट मधून प्रवेश मिळाला. आमच्यापैकी काही चालत तर काही घोड्यावरून जाणार होतो. अचानक वारा सुटला , विजांचा चमचमाट आणि मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. आम्ही घोड्यावरून जाणार होतो त्यामुळे घोडे ठरवले. ऊंचपुरे ऊमदे घोडे त्यावर चढून बसणे म्हणजे एक दिव्यच ! त्यातच तुफान पाऊस आणि सोसाट्याचा वारा. रेनकोट सावरत कसेबसे घोड्यावर बसलो. १२ वाजता आमच्या सात जणांची यात्रा सुरू झाली. संपूर्ण उभी चढण. मध्ये मध्ये चेकिंग साठी उतरायचे परत चढायचे. साडे तीन तासांच्या प्रवासानंतर ” घोडेतळ ” आला आणि आम्ही पायउतार झालो. पुढे १-२ कि मी मंदिरा पर्यंत पायी अनवाणी जायचे होते. तिथल्याच एका दुकानात बॅगा, पर्स, बूट ठेऊन चालायला सुरुवात केली. पुढे सर्व उतारच होता. मातेचे मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते. ” ब्राम्ह मुहूर्तावर ” जगन्मातेचे दर्शन होणार होते.
आधी मूळ स्थान – गुहेच्या कपारीत वैष्णव देवी लिंग स्वरूपात आहे. एका शिळेवर तीन ठशठशीत उंचवटे दिसतात. दुरूनच दर्शन घेऊन नवीन बांधलेल्या मंदिरात गेलो. व्यवस्थित बांधलेल्या गुहेतूनच जावे लागते. गुहेत बाजूंनी पाणी झिरपत होते. आपोआपच शुचिर्भूत होऊन विकसित गुहेस्वरुप मंदिरात पोचलो. गर्दी नव्हती. त्यामुळे पुजारी माहिती सांगत होते, प्रत्येकाला कुंकवाचा टिळा लावत होते. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली स्वरूपातील त्या जगत् जननीचे डोळे भरून दर्शन घेतानाच…..
” या देवी सर्व भूतेषु शक्तिरुपेण संस्थिता l
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ll ”
म्हणत मानस पूजा केली. सीलबंद पाकिटातून प्रसाद मिळाला. इथे एक छान आहे. हार – फुले, हळद – कुंकू, ओटी ही भानगड नाही. फक्त मानस पूजा करायची. जे द्यायचे आहे ते दानपेटीत.
अजून २ कि मी वर चढत जाऊन ५-१५ वाजता ‘ काळभैरवाचे ‘ दर्शन घेतले.
थोडी विश्रांती घेऊन परतीचा पूर्ण उताराचा प्रवास सुरू झाला. पहाटेचा गारवा सुखद वाटत होता. ८-१५ वाजता हॉटेलवर पोचलो.
सहा साडेसहा तास घोडयावरून केलेला प्रवास आता सर्वच अंगांनी जाणवू लागला होता. संपूर्ण दिवस आराम केला.
बुधवार १० जुलै २४ – सकाळी नाश्ता करून श्रीनगर कडे प्रस्थान केले. आमचा प्रवास काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत असणाऱ्या NH 44 वरून वळणावळणाने चालू होता. याच राजमार्गावर बोगदा आला. हा ” एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली ” असलेला आशियातील सर्वात लांब ( ९-२ कि.मी. ) बोगदा आहे. अशा या बोगद्याला ‘ स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी ‘ यांचे नाव देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याला दिलेली मानवंदना च आहे, असे मला वाटते.
बोगद्या नंतर निसर्गाचे रुप बदलले. सभोवताली हिरवी शेती, सफरचंदाच्या बागा दिसू लागल्या. थोडीशी वाकडी वाट करून अनंतनाग येथील प्रसिध्द मार्तंड सूर्य मंदीर पाहिले. हिंदू देवालय – विस्तीर्ण परिसर – काही भागात फुलबाग बहरली होती पण पूर्णपणे उध्वस्त झालेले . काश्मिरी वास्तुकला शैलीतील पण सध्या भग्नावस्थेतील ते मंदिर बघताना मन विषण्ण झाले.
श्रीनगर मध्ये प्रवेश करताच प्रथम ” अमरनाथ यात्रे ” करीता ‘ पर्ची ‘ ( ओळखपत्र ) घेतली.
गुरुवार ११ जुलै २४ – आम्ही बालतान मार्गे अमरनाथ ला जाणार होतो म्हणून सकाळी ८-३० वाजता सोनमर्ग करीता निघालो. रस्त्यात असणाऱ्या खीर भवानी मातेच्या मंदिरात गेलो. मंदिर परिसर मोठा आहे. अष्टकोनी तलावाच्या मध्ये मातेचे मंदिर आहे. ही दुर्गा माता असून फक्त हिंदूच नाही तर मुस्लिम ही दर्शनाला येतात. इथे प्रसाद म्हणून खीर देतात. अर्थात हे मंदिर ही सैनिकांच्या बंदोबस्तात आहे.
३-३० वाजता सोनमर्ग च्या ‘ माऊंटन ह्यू ‘ हॉटेलवर पोचलो. सारा परिसर हिरवाईने नटला होता. वाहणारा वारा थोडा थंड पण आल्हाददायक होता. दूरवरच्या काही बर्फाच्छादित रुपेरी शिखरांवरून घरंगळत आलेली सोनेरी सूर्यकिरणे समोर असलेल्या हिरव्या निळ्या डोंगर रांगावर स्थिरावली होती. ह्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करणे केवळ अशक्य !
शुक्रवार १२ जुलै २४ – अमरनाथ यात्रेकरूनचा पहिला ‘ जथ्था ‘ पहाटे ३-३० ला सोडतात. म्हणून आम्ही २-३० वाजता सोनमर्ग वरून निघालो. ३-१५ पर्यंत बालतानच्या बेसकँप ला. पोचलो. दोन तीन फेऱ्या मारल्या नंतर गाडी पार्किंग ला जागा मिळाली. उतरण्याची तयारी करत असतानाच निरोप आला – वर पाऊस पडत आहे. त्यामुळे यात्रा स्थगित केली आहे. दर्शनाची ओढ लागली होती.
‘ नको देवराया अंत आता पाहू ‘
असे प्रत्येकाला वाटत होते. जणू ही आर्तता महादेवा पर्यंत पोचली आणि ५-३० वाजता पहिला ‘ जथ्था ‘ अमरनाथ कडे रवाना झाला.
वर्षातून एकदाच होणारी ही ३०-४० दिवसाची यात्रा. त्यामुळे लाखो भाविक येतात. काश्मीरचा हा भाग संवेदनशील. त्यामुळे सुरक्षितता व व्यवस्थेच्या दृष्टीने भाविकांना गटागटाने सोडण्यात येते. बेस कँप ते वर मंदिरा पर्यंत सर्वत्र आपले सैनिक, BSF चे सैनिक पहारा देत असतात, मदत करत असतात.
आम्ही ही रांगेतून सिक्युरीटी चेकिंग करून पुढे गेलो. साधारण एक कि.मी चालत गेल्यावर ‘ घोडे तळ ‘ आला. आदल्या दिवशीच घोडे ठरविलेले असल्यामुळे घोडेवाले आमची वाटच पहात होते. वैष्णव देवी येथील घोड्यांच्या मानाने हे घोडे उंचीला लहान होते. पाठीवर खोगिर होती. पण चढणे अवघडच होते. एक पाय रिकीबित ठेऊन दुसऱ्या पायाची ” टांग “. टाकून बसायचे होते. खाली पावसामुळे झालेला चिखल. घोडेवल्यांच्या मदतीने एक एक करत सर्व घोड्यावर बसले. चढण सुरु झाली. काही अंतर गेल्यावर परत सिक्युरीटी चेकिंग साठी उतरावे लागले. पुढे जाऊन परत चिखलातून घोड्यावर बसण्याचे ‘ दिव्य कार्य ‘ पार पडले. त्यानंतर मात्र ६-१५ वाजता यात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीचा रस्ता पूर्ण चढणीचा, बाजूला दरी – त्यात वेगाने खळाळत वाहणारी नदी, पावसामुळे सर्व रस्ता चिखलाचा . हवेतल्या गारव्याने झोप येत होती. १/३ रस्ता संपल्यावर चहाचे टपरी वजा दुकान आले. सर्वच घोडेवाले तिथे थांबतात. चहापान थोडी विश्रांती घेतात आणि पुढे चालू लागतात. परत एकदा उतरण्याची चढण्याची कसरत झाली. पुढचा काही रस्ता वळणावळणाचा पण थोडा सपाट. एक डोंगर चढून झाला होता. आता उतरणीचा रस्ता ” उतार ” बघून भीतीच वाटली. ” यदाकदाचित घोड्याच्या मानेवरून घासरलो तर थेट कैलासावर शिवशंभू च्या भेटीला. “. असाही विचार मनात येऊन गेला.
दुसऱ्या डोंगराची चढण सुरु झाली. चढण – थोडी सपाट वाट – थोडी चढण – वळण – थोडा उतार – तिथून अमरनाथ गुहेचे दर्शन झाले. अजून बरेच अंतर जायचे होते. ११-३० वाजता ‘ घोडे तळा ‘ वर पोचलो. हजारो घोडे, माणसे सर्वत्र दिसत होती. अजून २ कि मी चा रस्ता पायी किंवा डोली ने जायचे होते. इथपर्यंतचा प्रवास आपत्तिविना झाला होता. पुढेही डोली ने जायचे ठरवले.
डोली वाल्याने काही पायऱ्या चढल्या नंतर उतरवले. पुढच्या पायऱ्या अनवाणी चढायच्या होत्या. एक डोली वाला बरोबर येणार होता. २५-३० पायऱ्या चढल्या की दर्शन होते हे डोक्यात इतके बसले होते की त्या उत्साहात मी १०-१२ पायऱ्या भरभर चढले. आणि चांगलाच दम लागला. तिथे असलेल्या नंदीचे दर्शन घेतले. काळया पाषाणाचा भव्य. ‘ नंदी ‘ फारच रेखीव अप्रतिम आहे. अजून १५०-२०० पायऱ्या चढायच्या होत्या. १० पायऱ्या चढून दम लागल्यामुळे इतक्या पायऱ्या चढणे अशक्य वाटू लागले. ” तुझ्या दर्शनाचा ध्यास घेऊन इथपर्यंत आले आहे, पुढे नेणारा तूच आहेस .”. असे मनोमन म्हणत हात जोडले. आणि एक एक पायरी चढायला सुरुवात केली. पवित्र गुहेपर्यंत पोचले. आनंद डोळ्यांतून वाहू लागला. नैसर्गिकरित्या बर्फाचे तयार होणारे स्वयंभू हिमानी शिवलिंग, पार्वती माता आणि गणेशाचे दर्शन साश्रू नयनांनी घेतले. प्रसाद मिळाला. गुहेमध्ये स्वच्छदपणे उडणाऱ्या दोनच पांढऱ्या कबुतरांचे दर्शन झाले. सारेच अनाकलनीय !
” अवघा यत्न फळा आला l अवघा झालासे आनंद ll”
अशा अवर्णनिय आनंदातच पायऱ्या उतरू लागले. गर्दी थोडी कमी झाल्यामुळे परत ‘ नंदी ‘ चे डोके टेकून दर्शन घेतले
सर्वांचे दर्शन व लंगर मधील प्रसाद/ भोजन झाल्यावर ३-३० वाजता घोड्यावरून परतीचा प्रवास सुरू झाला. मन मात्र अजूनही ‘ गुहेत ‘ च आडकले होते. थोडी चढण – उतार – चढण – उतार अशी मार्ग क्रमणा करत ७ वाजेपर्यंत बालतानच्या च्या ‘ घोडे तळा ‘ वर पोचलो. पुढे बस पर्यंत चालत आलो. सारेच दमले होते. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान, आनंद होता. थंडी, वारा, पाऊस, बर्फ यापैकी कुठलीही आपत्ती न येता आम्ही ” बाबा बर्फानी ” चे दर्शन घेऊन सुखरूप परत आलो होतो.
बेस कँप पासून अमरनाथ पर्यंतचा रस्ता चांगला चार फूट रुंद केला असून संपूर्ण रस्त्याला रैलिंग केले आहे. त्यामुळे प्रवास. सुखकर होतो. पण…. सर्वत्र वाढत चाललेले तापमान – भाविकांची गर्दी यामुळे सदैव बर्फाच्छादित असणारी हिमशिखरे उजाड, रखरखीत दिसत होती. मानव प्रगती होत असतानाच निसर्गाचा होणारा ऱ्हास अस्वस्थ करणारा होता.
शनिवार १३ जुलै २४ सकाळी १० वाजता श्रीनगर कडे निघालो. परतीचा प्रवास सुरू झाला. दरी डोंगर, कधी संथ तर कधी खळाळत वाहणारी ‘ झेलम ‘ नदी, थंड पण मनाला प्रफुल्लित करणारा वारा, सर्वत्र असलेली हिरवाई असे विलोभनीय सृष्टी सौंदर्य निरखत, अनुभवत ३-३० वाजता श्रीनगर ला पोचलो.
संध्याकाळी लालचौक बघण्यासाठी गेलो. पूर्वी दहशतीच्या काळात अनेक बॉम्ब स्फोट आणि बंदुकीच्या फैरी जिथे झडल्या, तेच ठिकाण आज पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. त्या चौकात असलेल्या ” क्लॉक टॉवर ” वर आज आपला ‘ तिरंगा ‘ डौलाने फडकताना पाहून ऊर अभिमानाने भरून आला. तिथेच असलेल्या बाजार पेठेत रहिवाशी, पर्यटक मुक्तपणे खरेदी करत होते, फिरत होते.
रविवार १४ जुलै २४ श्रीनगर दर्शन. –
शंकराचार्य मंदिर – गोपदरी पर्वतावर असलेले हे प्राचीन शिव मंदिर आहे. २७० पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिराच्या रम्य परिसरात पोचतो. हे मंदिर काश्मिरी शिखर शैलीतील असून संपूर्ण दगडी आहे. मंदिरातील शिवपिंडी ही दगडी असून भव्य आहे. ह्याचे दर्शन घेतल्यावर पायऱ्या चढल्याचे श्रम विसरून जातो, मन प्रसन्न होते..
काश्मीरचे निखळ सौंदर्य असलेली परिमहल – चष्मेशाही. – बोटॅनिकल – रोझ गार्डन पहिली. भिंतीच्या संरचनेत कालवे, कारंजे, वाहते पाणी, सर्वत्र हिरवळ, विविधरंगी फुलझाडे, फळझाडे, शोभेची झाडे आहेत. मुघल, इस्लामिक वस्तुकलेची झलक असलेल्या या विस्तीर्ण बागा वेगवेगळ्या काळात निर्माण केल्या. पण आजही त्या. चांगल्या प्रकारे जतन केल्या आहेत .
‘ दाल ‘. सरोवरातील शिकारा सफर म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव.
गेल्या आठ दिवसांपासून आम्ही १४ + २ ( श्री विवेक सर, किरण ) एकत्र फिरत होतो. सर्वांचीच छान मैत्री जमली होती. वेगवेगळा वयोगट असूनही सर्वच एकमेकांशी आदराने, प्रेमाने, आपुलकीने वागत होते. आम्ही सात आठ जण तर साठ/ साठीच्या पुढचे.
१२७२६ फुटावर असलेल्या ” अमरनाथ गुहे ” पर्यंत आम्हा ज्येष्ठांना घेऊन जाणे हे खर तर एक आव्हानच होते. सर्व यात्रांमध्ये अवघड असलेली ही यात्रा. पण श्री विवेक सरांनी हे आव्हान स्वीकारले आणि यशस्वीही केले. यात श्री किरणचेही मोलाचे सहकार्य आहे.
उत्तम नियोजन , राहण्याची – भोजनाची उत्कृष्ट सोय, आरामदायी प्रवास, आपुलकी, जिव्हाळा, भेटी देण्याच्या ठिकाणचे सखोल ज्ञान ही तर ” दुर्ग मल्हार” ची वैशिष्टे !
श्री. विवेक सर स्वतः ट्रेकर. त्यामुळे ट्रेकिंग व तेथील भौगोलिक परिस्थिती अंदाज घेऊन वेळोवेळी केलेल्या सूचना ( अगदी पहिल्या मीटिंग पासून ) व सर्वांच्या सहकार्याने घेतलेले निर्णय. यामुळे खडतर पण आनंद दायी झालेली ही वैष्णव देवी व अमरनाथ यात्रा अविस्मरणीय झाली.
” दुर्ग मल्हार” च्या सर्वच यात्रा व सहली अशाच यशस्वी होवोत हीच सदिच्छा !
धन्यवाद ! 🙏🏻
मंगला कुळकर्णी
बदलापूर.